परतीच्या पावसाने शेतकरी हवालदिल

ठाणे, रायगड आणि पालघर फटका

दुपारी पडलेल्या कडक उन्हामुळे अंगातून घामाच्या धारा निघत असताना सायंकाळी अचानक बदललेल्या वातावरणामुळे मुंबईकर सुखावला. मुंबईसह राज्यात पावसाने अचानक लावलेल्या हजेरीमुळे शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले. विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना करत आलेल्या पावसामुळे कापणी केलेल्या भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तयार झालेले धान्य भिजल्याने ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी चिंतातूर झाला आहे.

मुंबईत शनिवारी सकाळी आकाश स्वच्छ होते. दुपारी तर रखरखीत ऊन पडले होते. मात्र, दुपारी दोन ते तीननंतर मुंबई शहर आणि उपनगरात मोठ्या प्रमाणावर पावसाचे ढग दाटून आले. ढगांचा गडगडाट सुरू झाला. मुंबईत चार वाजण्याच्या सुमारास बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली. तर राज्यामध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली. पुण्याला शनिवारी दुपारी पावसाने जोरदार झोडपले. अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण भागात आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून वाढत्या तापमानाने त्रासलेल्या लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण ठाणे जिल्ह्यात तापमानात वाढ झाली असून उन्हाचे चटके बसत होते. आर्द्रताही वाढल्याने उन्हात फिरताना लोकांचा जीव कासावीस होत होता. मात्र, आज दुपारच्या सुमारास पडलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून उन्हाच्या काहिलीने त्रासलेल्या लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगरच्या काही भागात पावसाने तुफान फटकेबाजी केली. कोथरूड, कर्वेनगर, वारजे, कात्रज, पाषाण, सिंहगड रस्ता आदी भागात पावसाने दमदार हजेरी लावली. परभणी, लातूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बुलढाणा जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. मराठवाड्यातही आज विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला. औरंगाबाद, लातूर, हिंगोली, बीड या जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला. तर जालना, उस्मानाबाद जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह तुरळक पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात अनेक दिवसांनंतर पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील सेलू, कुपटा, वालूर तसेच पूर्णा या दोन तालुक्यात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. पाथरी, जिंतुर, परभणी तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत. जरी अनेक दिवसांनंतर पाऊस झाला असला तरीही यामुळे कापसाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस झाला. त्याचप्रमाणे रायगडमध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे शेतकर्‍यांनी कापलेली भातशेतीत पाणी गेले. अगोदरच अतिवृष्टीमुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकर्‍यांना परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकर्‍यांनी भातशेती कापणीला जोर दिला होता. अतिवृष्टीमुळे भातांचे पिक कुजले होते. त्यात आता या पावसाने अधिकच नुकसान केल्याची भावना शेतकर्‍यांनी व्यक्त केली.

राज्यात ऑरेंज अलर्ट
विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये रविवार आणि सोमवारी ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात उल्लेखनीय बदल झाले असल्याने हा अलर्ट देण्यात आला आहे. सोमवारी मुंबईसह संपूर्ण कोकण परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये, असे आवाहन भारतीय हवामान शास्त्र विभागाने केले आहे.

कसा पडेल पाऊस
११ ऑक्टोबर – विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोव्यात मुसळधार ते अतिमुसळधार
१२ ऑक्टोबर – विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार
१३ ऑक्टोबर – विदर्भ, मराठवाडा, कोकण, गोव्यात मुसळधार
१४ ऑक्टोबर – मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोव्यात मुसळधार

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
बंगालच्या उपसागरात शनिवारी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. हा पट्टा आंध्र प्रदेशमार्गे जमिनीकडे सरकत आहे. त्यामुळे येणार्‍या चार दिवसांमध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमधे विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 14 ऑक्टोबरनंतर अंदमान बेटांच्या भागात आणखी एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. तो झाल्यास पुन्हा त्यानंतर देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे.