घरताज्या घडामोडीकोरोनाला हरवलं, अन् पुन्हा एकदा दिली एसटीची बेल

कोरोनाला हरवलं, अन् पुन्हा एकदा दिली एसटीची बेल

Subscribe

एसटीची स्टेअरिंग सांभाळण्याची जितकी जबाबदारी महत्त्वाची असते, त्याहून मोठी जबाबदारी असते ती म्हणजे संपूर्ण प्रवासी वाहतुकीची. चिटपाखरूही घराबाहेर पडत नव्हते त्या काळात आम्ही कोरोनाच्या फ्रंटलाईन वॉरिअर्ससाठी एसटीची सेवा देण्यासाठी पुढे आलो. सेवा ही दानासारखीच असते, त्याचं मोजमाप, तुलना केल्याने त्याचं महत्त्व कमी होते; पण अजूनही समाज म्हणून महिला वाहकांकडे प्रोफेशनल्स असा बघण्याचा दृष्टीकोन बदलेला नाही. कोरोनाच्या काळात सेवा देताना कोरोना पॉझिटिव्ह झाले, तरीही जिद्दीने कोरोनाची लढाई जिंकत पुन्हा एकदा सेवेत रूजू झालेल्या विधी पवार यांची जिद्द सगळ्या महिलांसाठी एक आदर्श देणारी अशीच आहे.

मी विधी पवार. गेली दहा वर्षे मुंबई वाहक आगारात एसटी कंडक्टर म्हणून काम करतेय. लॉकडाऊनमध्ये कोरोनाच्या कठीण आणि आव्हानाच्या काळात काम करण्याचा अनुभव हा दहा वर्षांपेक्षा किती तरी मोठा आहे. आपण सेवा क्षेत्रात काही तरी समाजासाठी चांगलं योगदान दिले ही आयुष्यातली खूप मोठी शिकवण आहे. जसजशा अनलॉकच्या टप्प्यांची घोषणा होऊ लागली, तसतशा आमच्या मुंबई-अलिबाग, मुंबई- स्वारगेट, मुंबई- त्र्यंबकेश्वर फेर्‍या आता दादर-पनवेल, दादर-कल्याण अशा एसटीच्या फेर्‍या सुरू झाल्या.

- Advertisement -

आमच्या माध्यमातूनच मुंबई महानगर क्षेत्रातील कोरोना काळात अत्यावश्यक सेवेत काम करणार्‍या कोरोना योद्धासाठी ही एसटीची सेवा राज्य सरकारमार्फत सुरू करण्यात आली. जिथे माणूस माणसाला शेजारी उभं करत नाही अशा स्थितीत आमच्यासाठीही सगळंच आव्हानाचं होतं. इतकी वर्षे तिकीट तिकीट म्हणून पुढे जाणारा हात आता बाहेर काढण्यासाठीही भीती वाटत होती. पण आता घाबरलो तर पुन्हा कधीच अशी सेवा करायला मिळणार नाही या विचारानेच कंबर कसली आणि कामाला लागले. एसटी प्रवासासाठीचा प्रोटोकॉल जाहीर झाल्यानुसार आम्ही अत्यावश्यक सेवेतील पोलीस, नर्स, डॉक्टर, बँकेचे कर्मचारी यांना सेवा द्यायला सुरुवात केली होती.

घर सांभाळून काम करणे हे काही नवीन नव्हते. पहिल्यापासून घर सांभाळून कामावर जाणे हे शेड्यूल तयार झाले होते. फक्त या काळात जास्त संयम ठेवण्याची गरज होती. आता स्वत:सोबत घरच्यांची आणि प्रवाशांची ही काळजी घ्यायची होती. सुरुवातीच्या काळात नोकरीवर जायचं का नाही याबाबत कुटुंबियांनी अनेक शंका व्यक्त केल्या; पण मी या काळात काम करायचे हे मनाशी पक्के ठरवले होते. जे कोरोना योद्धा लोकांच्या सेवेसाठी घराबाहेर पडले होते त्यांच्यासाठी आम्हाला सेवा द्यायची होती. त्यामुळे हार न मानता सगळ्यांसोबत लढाई करायची, सगळ्यांना सहकार्य करायचे हे मनाशी पक्के ठरवून आम्ही कंडक्टर महिला एकत्र आलो.

- Advertisement -

एसी कंडक्टर म्हणजे उभ्याने काम. तिकीट फाडण्यापासून शेवटच्या स्टॉप पर्यंत लोकांना सुचना देणे. लाल परिसोबतचा प्रवास हा काही नवीन नव्हता. पण या काळात मनात धाकधूक असायची. तू अनेकांच्या संपर्कात येतेस तुझ्यामुळे आम्हाला त्रास झाला तर. असे एक ना अनेक प्रश्न रोज समोर उभे ठाकायचे. पण या सगळ्यात नवर्‍याची साथ नेहमीच सोबत राहिली. त्यामुळे रोज नव्याने ड्युटी निभावण्यासाठी अंगात नवीन बळ यायचे. ऑन ड्युटी काम करताना किंवा घरी आल्यावरही योग्य ती काळजी वेळोवेळी घेत आलेले.आमच्या तिकीट मशीन नंतर मास्क आणि ग्लोजही आता आमचे नवीन सोबती झाले होते; पण शेवटी तो क्षण आलाच. अनेकांच्या संपर्कात आल्यामुळे मी कोरोना पॉझिटिव्ह आले.

महापालिकेने क्वारंटाइन केले. योग्य औषधोपचार घेतला आणि पुन्हा बरी होऊन कामावर जायचं ठरवलं. पोटची मुलगी अशा परिस्थितीत घराबाहेर पडून काम करतेय म्हटल्यावर आईच्या डोळ्यातही पाणी आले. पण मी कुठेही खचले नाही. माझी हिमंत हारले नाही. ज्या दिवशी कोरोना पॉझिटिव्ह आले त्या दिवशीच मनाशी पक्के ठरवले की आपल्याला मिळालेली ही थोड्या दिवसांची सुट्टी आहे. सुट्टी संपल्यावर पुन्हा आपल्याला लोकांच्या सेवेसाठी रूजू व्हायचे आहे. घरच्यांची समजूत काढली. मी बरी होणार आणि कामावर रूजू होणार. सगळं व्यवस्थित होणार आहे. तुम्हीही तुमची काळजी घ्या, असे वेळोवेळी समजावून सांगत होते. नवर्‍याच्या खंबीर पाठिंब्यामुळे मी आज पुन्हा एकदा कामावर रूजू झाले आणि माझे काम मी आजही तत्परतेने करते आहे.

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -