महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री ठरवणारे आशिष शेलार कोण?

anil-parab
सेना प्रवक्ते अनिल परब यांचा सवाल

राज्यात सत्ता महाविकास आघाडीची आहे. आघाडीचा मुख्यमंत्री कोण असावा, हे आघाडीतील तीन घटक पक्ष ठरवतील. हा अधिकार आशिष शेलार यांना कोणी दिला, असे विचारत शिवसेना प्रवक्ते अनिल परब यांनी शेलार यांच्यावर हल्लाबोल केला. ते भाजपची मराठा महिला मुख्यमंत्री म्हणत आहेत की महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री? महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री कोण होणार हे आशिष शेलार ठरवणार आहेत काय? असा थेट सवाल त्यांनी केला. शेलार यांना भाजपचा मुख्यमंत्री करायचा असेल तर त्यांना जी स्वप्ने पडली आहेत, त्यावेळी त्यांनी तो करावा. आघाडीच्या कारभारात पाहू नये, असा सल्लाही परब यांनी शेलार यांना दिला.

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शुक्रवारी मुंबईतील एका कार्यक्रमात कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, असे वक्तव्य केले होते. त्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली होती. यावर बोलताना परब यांनी शेलारांना चिमटा काढला. चंद्रकांत पाटील यांनी मराठा महिला मुख्यमंत्री कोण, हा आम्ही ठरवण्याचा विषय नसल्याचे स्पष्ट केले. उद्या शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करावेसे वाटले तर त्यांनी करावे. त्यात आमचा रोल काय? आम्ही सुषमा स्वराज यांना मुख्यमंत्री केले होते.

राज्यपाल नियुक्त आमदारांचा निर्णय राज्यपालांनी 15 दिवसात घ्यावा, असे सरकारने राज्यपालांना कळवले आहे. ते 15 दिवस उलटून गेले आहेत. ती राज्यपालांना केलेली विनंती आहे, कायदा नाही. विनंतीचे काय करायचे हे राज्यपालांनी ठरवायचे आहे; पण त्यांनी अजून काहीही केलेले नाही. आघाडीचे नेते एकत्रितपणे पुढे काय करायचे याचा निर्णय घेतील. सगळ्या गोष्टी तपासून पुढचा निर्णय घ्यावा लागेल.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीला अजून सव्वा वर्ष आहे. सर्व नेते एकत्र बसून निर्णय घेतील. शिवसेना ही निवडणुकीसाठी जन्माला आलेला पक्ष नाही. निवडणूक असो वा नसो, पक्षप्रमुख नेहमीच आढावा पदाधिकार्‍यांकडून घेत असतात. तसाच आढावा घेणे सुरू आहे. निवडणुका आल्या की छत्र्या उघडायच्या, असा हा पक्ष नाही, 365 दिवस शिवसेनेचे काम सुरू असते. त्यामुळे निवडणुकीची आम्हाला वेगळी तयारी करावी लागत नाही. प्रत्येक पक्षाला स्वप्न बघण्याचा अधिकार आहे. त्यांनी ती जरूर पाहावीत. आम्ही त्यांच्या स्वप्नामध्ये व्यत्यय आणणार नाही, ज्या दिवशी स्वप्न भंग होईल त्यादिवशी आम्ही बोलू, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.