घटस्थापनेच्या मुहुर्तावर महिलांना लोकल खुली

सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत, संध्या ७ नंतर शेवटच्या लोकलपर्यंत, क्यूआर कोडची आवश्यकता नाही

western railway will add 40 additional suburban services on wrs mumbai suburban section
मुंबई लोकल

अनलॉकिंगदरम्यान सर्व काही सुरळीत होत असताना, मुंबई लोकल मात्र सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांनाच मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा दिलेली आहे. मात्र, राज्य सरकारने आता घटस्थापनेच्या मुुहुर्तावर महिलांनाही मुंबई लोकलमध्ये प्रवास करण्याची परवानगी शुक्रवारी दिली. ठाकरे सरकारने त्याबाबतचे पत्रकही प्रसिद्ध केले आहे. महिलांना मुंबईच्या लोकलमध्ये सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत तर संध्याकाळी 7 नंतर शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी क्यूआर कोडची आवश्यकता नाही. असे असले तरी रेल्वे खात्याने राज्य सरकारच्या निर्णयावर पाणी फिरवत १२ तासात महिलांसाठी लोकल सुरू करणे अशक्य असल्याचे राज्य सरकारला कळविले आहे. दोन आठवड्यापूर्वी केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी रेल्वेचे तयारी आहे, आमच्याकडे अजून राज्य सरकारचा प्रस्ताव नसल्याचे सांगितले होते. मात्र राज्य सरकारने शुक्रवारी पत्रक काढून महिलांसाठी १७ ऑक्टोबरपासून रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला त्याला रेल्वेने खोडा घातला आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊनदरम्यान मुंबई लोकल रेल्वे 22 मार्चपासून बंद होती. त्यानंतर अनलॉकिंग झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली. पण सर्वसामान्य नागरिकांना लोकलमध्ये प्रवेश मिळत नसल्याने, सर्वसामन्य मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. शिवाय रस्त्यावर ट्रॅफिकमुळे मुंबईकरांचे अनेक तास हे प्रवासातच जात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मनसेसह अनेकांनी मुंबई लोकल रेल्वे सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याची मागणी लावून धरली आहे. दरम्यान, मुंबईसह एमएमआर रिजनमधील महिलांना उद्यापासून लोकलने प्रवास करता येणार आहे. तसेच महिलांना प्रवास करताना क्यू आर कोडची आवश्यकता नसेल. सकाळी 11 नंतर महिलांना रेल्वेने प्रवास करता येणार आहे. त्यामुळे चाकरमानी महिलांना याचा फार फायदा होणार नाही. गेल्या अनेक दिवसांपासून विविध राजकीय पक्षांनी लोकल सुरू करण्याची मागणी केली होती. अखेर महिलांसाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठीच लोकल चालवल्या जात आहेत. त्यात कोणताही बदल करण्यात येऊ नये, असे नमूद करताना मागणीनुसार लोकलची संख्या वाढवण्यात यावी, असेही पत्रात म्हटले आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या या पत्रावर मध्य रेल्वेकडून सकारात्मक प्रतिक्रिया आली आहे. सरकारच्या विनंतीनुसार आम्ही पावले टाकत आहोत. संबंधित विभागांची मंजुरी मिळताच याबाबत अंमलबजावणी करण्यात येईल, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले.

आजपासून महिलांना  प्रवेश नाही-रेल्वे

इतक्या कमी कालावधीत महिलांसाठी लोकल अशक्य

रेल्वे सर्वांसाठी पूर्ण क्षमतेने लोकल चालवण्यास तयार आहे. मात्र, राज्य सरकारकडूनच तसा प्रस्ताव येत नाही, अशी कैफियत रेल्वेने मांडली असताना महिलांसाठी त्वरित लोकल चालवण्यास रेल्वे मंत्रालयाकडून असमर्थता दर्शवण्यात आली आहे. राज्य सरकारने शुक्रवारपासून महिलांसाठी लोकल सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वेकडे ठेवला असताना इतक्या कमी कालावधीत महिला प्रवाशांसाठी लोकल सुरू करणे शक्य नसल्याचे रेल्वेमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. इतक्या कमी कालावधीत सरसकट महिलांसाठी लोकल सेवा सुरू करणे शक्य होणार नाही. लोकल सुरू करण्यापूर्वी रेल्वे आणि राज्य सरकारच्या अधिकार्‍यांमध्ये एक संयुक्त बैठक घेणे गरजेचे आहे, असे रेल्वे विभागाने स्पष्ट केले आहे. सोशल डिस्टन्सिंग राखण्याची गरज तसेच कोविड प्रोटोकॉल पाळणे गरजेचे असल्यानेच ही बैठक व्हायला हवी. राज्य सरकारने दिलेला प्रस्ताव हा रेल्वे बोर्डाच्या मंजुरीसाठी पाठवणे गरजेचे आहे, असे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे लोकल प्रवासासाठी महिला प्रवाशांना आणखी काही काळ थांबावे लागणार आहे.