कामाची बातमी: डेबिट कार्ड फ्रॉडपासून वाचण्यासाठी या १० गोष्टी लक्षात ठेवा

प्रातिनिधिक छायाचित्र

डिजिटल बँकिंगचा बोलबोला वाढत चालला आहे. बँकेतून पैसे काढण्यासाठी रांग लावण्यामध्ये हल्ली कुणालाच रस नसतो. त्यापेक्षा प्लास्टिक मनी खिशात असेल तर कधीही कुठेही पैसे काढता येतात, बिल भरता येते, खरेदी करता येते. त्यामुळे डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर वाढायला लागला आहे. त्यासोबतच वाढत आहेत ऑनलाईन आणि कार्ड पेमेंटचे गुन्हे. तंत्रज्ञान जसं बदलतं तस चोर लोकही स्वतःला अपडेट करत असतात. लोकांना लुटण्यासाठी ते नवे नवे फंडे शोधून काढतात. त्यामुळे ऑनलाईन फ्रॉडची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र या गुन्ह्यांची उकल करणे कठिण होत आहे. त्यामुळे आपल्या पैशांचे रक्षण आपल्यालाच करायला हवे.

तुम्ही जेव्हा एखाद्या दुकानात खरेदी केल्यानंतर कार्ड पेमेंट करता, तेव्हा फ्रॉड होण्याची शक्यता अधिक वाढते. तसं बँक नेहमीच आपल्या ग्राहकांना मेसेज पाठवून सचेत करत असते. फ्रॉडपासून वाचण्यासाठी आपल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा पिन नंबर कुणालाही सांगू नका, असे बँकेतून वारंवार सांगण्यात येते. मात्र याशिवाय आणखी काही दक्षता घेतल्यास तुम्ही ऑनलाईन फ्रॉडपासून सुरक्षित राहू शकता.

१) जेव्हा तुम्ही एखाद्या एटीएममध्ये जाल तेव्हा एका हाताने पिन नंबर टाकत असताना दुसऱ्या हाताने मशीनचे किपॅड झाकण्याचा प्रयत्न करा. जेणेकरुन एटीएम बाहेर उभ्या असलेल्या व्यक्तिला किंवा कॅमेऱ्यामध्ये पिन नंबर दिसणार नाही.

२) आपला पिन नंबर कुठेही लिहून ठेवू नका किंवा सांगू नका

३) शॉपिंग आणि एटीएममधून आलेली रिसीट जपून ठेवा किंवा फाडून फेकून द्या.

४) कार्डवर कधीही पिन नंबर लिहून ठेवू नका किंवा कार्डवर असलेल्या नंबरपैकी चार आकडे पिन म्हणून ठेवू नका.

५) कार्डच्या माहितीबाबत जर फोन किंवा ईमेल आला तर त्याला कोणतेही उत्तर देऊ नका.

६) कार्डचा पिन जनरेट करताना जन्मदिनांक किंवा फोन नंबर किंवा चालू वर्षाचा पिन देणे टाळा.

७) किपॅडच्या हेरफार पासून वाचण्यासाठी हीट मॅपिंगचा वापर करा

८) ATM वापरत असताना सोबत कुणालाही उभे राहून देऊ नका. जर तिथे कुणी असेल तर त्याला बाहेर जाण्याची विनंती करा.

९) ऑनलाईन वेबसाटईवर डेबिट कार्डची माहिती टाकताना विश्वासार्ह साईटवरून खरेदी करा.

१०) तुमच्या अकाऊंटवर होणाऱ्या प्रत्येक ट्रॅन्झॅक्शनबाबत SMS सर्विस सुरु करुन घ्या.