SBI चा ग्राहकांना इशारा; या गोष्टी टाळा नाहीतर दिवाळीआधीच दिवाळं निघेल

दिवाळी तोंडावर आली असताना फोनवर दिवाळी ऑफर्सचे मॅसेज यायला सुरुवात झाली आहे. या मॅसेजद्वारे आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्रहाकांना इशारा दिला आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या खोट्या मॅसेजपासून सावधानता बाळगा. दिवाळीआधी ऑनलाइन होणाऱ्या फसवणुकीपासून सजग राहणे ग्राहकांचे कर्तव्य आहे आणि याबाबत बँकेकडून वेळोवेळी ग्राहकांना अलर्ट करण्यात आले आहे. बँकेने असे म्हटले आहे की, फसवणूक करणारे भामटे सोशल मीडियावर बनावट मेसेज पाठवत आहे, बँकेकडून त्यांच्या ग्राहकांना असे मेसेज पाठवले जात नाही आहेत.

SBI ने याबाबत एक ट्विट करत ग्राहकांना इशारा दिला आहे. “SBI ग्राहकांना अशी विनंती करते की सोशल मीडियावर अलर्ट राहा आणि कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या किंवा बनावट मेसेजच्या जाळ्यात अडकू नका,” अशा आशयाचा मॅसेज SBI ने ट्विट केला आहे. बॅकेच्या या मॅसेजकडे दुर्लक्ष केल्यास दिवाळीआधीच दिवाळं निघेल.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक बनावट कंपन्या ऑफर्सच्या नावाखाली लोकांना लूटत आहेत. त्यामुळे बॅकेने ग्राहकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. SBI ने याआधी त्यांच्या नावाने सुरू झालेल्या बनावट वेबसाइट विषयी देखील ग्राहकांना अलर्ट केले होते.