खासगी कोरोना रुग्णालयात चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक

Theft at private Corona Hospital
प्रातिनिधिक छायाचित्र

पश्चिम उपनगरातील प्रसिद्ध खासगी रुग्णालयात प्रवेश करून कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांचे दागदागिने, रोकड आणि महागडे मोबाईल चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर मुंबईत ३०पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्याची नोंद असून त्यापैकी १६ गुन्ह्यामध्ये त्याला शिक्षा देखील झाली होती अशी माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आरिफ इद्रिस पठाण (३०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पश्चिम उपनगरातील ओशिवरा येथील झोपडपट्टीत राहणारा आरिफ हा मागील काही वर्षांपासून गुन्हेगारी क्षेत्रात कार्यरत आहे. त्याच्यावर जबरी चोरी, वाहन चोरी, घरफोडी यासारखे ३० पेक्षाही अधिक गुन्ह्याची नोंद मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात दाखल असून १६ गुन्ह्यामध्ये न्यायालयाने त्याला दोषी ठरवून शिक्षाही ठोठावलेली आहे. शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर आरिफने पुन्हा गुन्हे करण्यास सुरुवात केली होती.

गोरेगाव पूर्व दिंडोशी येथील एका प्रसिद्ध खासगी रुग्णालयात कोरोनाच्या उपचारासाठी दाखल असलेल्या वयोवृद्ध दाम्पत्याचे नातेवाईक रुग्णालयातील प्रतीक्षालयात झोपलेले असताना त्याच्याजवळील मोबाईल, दागिने आणि रोकड असा एकूण सव्वा लाख रुपये असलेली पिशवी चोरीला गेली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शाखा कक्ष १२चे प्रभारी पोलीस निरीक्षक महेश तावडे यांच्या पथकाने रुग्णालयातील सीसीटीव्ही तपासली असता एक इसम रुग्णालयातील प्रतीक्षालयात संशयास्पदरित्या फिरतांना आढळून आला.

कक्ष १२ चे प्रभारी पोनि. महेश तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.सचिन गवस,अतुल डहाके सपोनि. विक्रमसिंग कदम, आव्हाड, शेळके आणि पथकाने संशयास्पदरित्या फिरणाऱ्या इसमाची माहिती काढून ओशिवरा परिसरातून आरिफ पठाण या संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरिफ पठाण याला पोलिसांनी अटक करून त्याने गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरिफ पठाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून काही गुन्ह्यात त्याला शिक्षा देखील झाली असून त्याला तडीपार देखील करण्यात आले असल्याची माहिती प्रभारी पोनि. महेश तावडे यांनी दिली.