घरक्राइमपालघर गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणात ८९ जणांना जामीन

पालघर गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणात ८९ जणांना जामीन

Subscribe

आतापर्यंत या हत्याकांडात अटक केलेल्या २०१ आरोपींपैकी ११५ जणांना जामीन मिळाला आहे.

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांपैकी ८९ आरोपींना शनिवारी ठाणे न्यायालयाने प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जामिनावर सोडले आहे. आतापर्यंत या हत्याकांडात अटक केलेल्या २०१ आरोपींपैकी ११५ जणांना जामीन मिळाला आहे. जामिनावर सोडण्यात आलेले आरोपी केवळ घटनास्थळी दाखल होते, त्यांचा या हत्याकांडात प्रत्यक्षात कुठलाही संबंध नव्हता. त्यामुळे त्यांना जामीन देण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या गडचिंचले गावात मागील वर्षी १६ एप्रिलला दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकाला दरोडेखोर समजून गावकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यात या तिघांचाही मृत्यू झाला.

या तिहेरी हत्याकांड प्रकरणात १६५ आरोपींना अटक करण्यात आली असून यातील ११ जण अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी भिवंडी येथील बाल सुधारगृहात करण्यात आली होती. तसेच या प्रकरणात स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. कासा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकारी आणि तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन, तसेच ३५ कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदली करण्यात आली आहे. तसेच येथील पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते.

- Advertisement -

राज्य शासनाने या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे शाखेकडे (सीआयडी) सोपवला होता. राज्य गुन्हे शाखेने याप्रकरणी आणखी काही आरोपींना अटक केली. त्यामळे अटक झालेल्यांची संख्या २०१ झाली होती. या प्रकरणात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते. हा खटला ठाणे न्यायालयात सुरु असून याप्रकरणात आरोपपत्रे दाखल झालेली आहेत. दरम्यान शनिवारी या प्रकरणातील ८९ जणांना प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जामिनावर ठाणे न्यायालयाने सोडले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -