घरक्राइमदाऊदचा खास सहकारी चिंकू पठाण अटकेत; ड्रग्ज कारखान्यांचा एनसीबीकडून पर्दाफाश

दाऊदचा खास सहकारी चिंकू पठाण अटकेत; ड्रग्ज कारखान्यांचा एनसीबीकडून पर्दाफाश

Subscribe

दाऊदचा खास सहकारी म्हणून परिचित असलेला परवेज खान ऊर्फ चिंकू पठाण याला अटक करण्यात आली.

करीमलालाचा नातेवाईक आणि दाऊदचा खास सहकारी म्हणून परिचित असलेला परवेज खान ऊर्फ चिंकू पठाण याला अटक करण्यात आली. त्याच्या अटकेनंतर डोंगरीतील एका ड्रग्ज कारखान्यांचा पर्दाफाश करण्यात नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्‍यांना यश आले आहे. गेल्या पाच वर्षांपासून तिथे ड्रग्जचा कारखाना सुरु असल्याचे तपासात उघडकीस आले. कारखान्याचा मालक आणि परवेजचा सहकारी आरिफ भुजवाला या कारवाईपूर्वीच पळून गेला आहे. त्याच्याविरुद्ध लवकरच लुक आऊट नोटीस जारी केली जाणार आहे. या कारवाईत पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचे बारा किलो ड्रग्ज, दोन रिव्हॉल्व्हर, २ कोटी १८ लाख रुपयांची कॅश आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे.

५२ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्जसह पिस्तूल जप्त

गेल्या काही दिवसांत ड्रग्ज तस्काराविरुद्ध एनसीबीने धडक मोहीम सुरु केली होती. याच गुन्ह्यांत मंगळवारी दोन तस्करांना एनसबीने अटक केली. त्यांच्या चौकशीत ते दोघेही दाऊदचा सहकारी परवेज खान याच्यासाठी ड्रग्ज तस्करी व्यवसायात असल्याचे उघडकीस आले आहे. परवेज हा नवी मुंबईतून ड्रग्जचे सर्व व्यवहार सांभाळतो. त्यानंतर या पथकाने नवी मुंबईतील घणसोली परिसरात छापा टाकून परवेज खानला शिताफीने अटक केली. यावेळी त्याच्याकडून पोलिसांनी ५२ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्जसह एक पिस्तूल जप्त केले होते. परवेजसोबत झाकीर हुसैन फझल शेख हादेखील सापडल्याने या दोघांनाही नंतर ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत अटक करण्यात आली होती. तपासात परवेज हा दाऊदचा अत्यंत खास आणि जवळचा सहकारी आहे. तो दाऊद टोळीसाठी ड्रग्ज तस्करीचे सर्व व्यवहार सांभाळत होता. त्यातून येणारी रक्कम तो हवालामार्फत दुबई येथे पाठवित होता. त्याला मुंबई पोलिसांनी तडीपार केले होते. त्यामुळे तो सध्या नवी मुंबईतून त्याच्या टोळीचे सूत्र हलवित होता.

- Advertisement -

ड्रग्ज कारखान्यांचा एनसीबीकडून पर्दाफाश

पवेज हा राज्यातील एक मोठा ड्रग्ज सप्लायर म्हणून परिचित आहे. त्याच्याकडे कुठल्याही ड्रग्जची मागणी करा, ते ड्रग्ज संबंधित व्यक्तींना काही तासात मिळणार, अशी ओळख परवेजची होती. परवेजच्या चौकशीत त्याचा खास सहकारी आरिफ भुजवाला याचे नाव समोर आले होते. आरिफ हा डोंगरी परिसरात राहत असल्याने एनसीबीच्या एका विशेष पथकाने तिथे छापा टाकला होता. यावेळी आरिफ हा तेथून पळून गेला होता. परवेजच्या अटकेची माहिती मिळताच पळून गेल्याचे बोलले जाते. त्याच्या नूर मंझिल इमारतीच्या चौथ्या मजल्यावर या अधिकार्‍यांना ड्रग्ज बनविण्याचा एक कारखाना सापडला. गेल्या पाच वर्षांपासून तिथे ड्रग्ज बनविले जात होते. तेथील लॅब पाहिल्यानंतर एनसीबीच्या अधिकार्‍यांनाही धक्का बसला होता. या लॅबमधून या अधिकार्‍यांनी बारा किलो ड्रग्जसह काही केमिकल्स हस्तगत केले होते. त्यानंतर आरिफच्या घरी या अधिकार्‍यांनी छापा टाकला होता. या छाप्यात या अधिकार्‍यांना २ कोटी १८ लाख रुपये आणि एक रिव्हॉल्व्हर सापडले.

कारवाईदरम्यान या अधिकार्‍यांना काही महागड्या कारच्या चाव्या सापडल्या. जप्त केलेले रिव्हॉल्व्हर नंतर फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले होते. तपासात आरिफ आणि परवेज हे दोघेही दक्षिण मुंबईत ड्रग्जचे नेटवर्क चालवित होते. त्यांचे कनेक्शन दुबईशी असल्याचे उघडकीस आले असून खाण्यापिण्याच्या सामानातून त्यांची ड्रग्जची तस्करी सुरु होती. पठाण टोळीकडून अशा प्रकारे ड्रग्जची पूर्वी तस्करी केली जात होती. घटनास्थळी पोलिसांना एक डायरी सापडली असून त्यात ड्रग्जशी संबंधित व्यक्तींचे नाव, त्यांना देण्यात आलेले ड्रग्ज, आर्थिक व्यवहाराचा संदर्भ असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

कोण आहे परवेज खान?

परवेज स्वत:ची प्रचंड काळजी घेत होता. ओळख नसलेल्या व्यक्तींना भेटणे तो नेहमीच टाळत होता. कारवाईसाठी बचाव करण्यासाठी त्याने घरातच सीसीटिव्ही कॅमेरे आणि वायमेट्रीक यंत्रणा बसविली होती. त्यातून तो तिथे येणार्‍या प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवून होता. ड्रग्जमधून येणारा पैसा तो हवालामार्फत दुबईत पाठवित होता. दुबईत त्याने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केल्याचे बोलले जाते. परवेजच्या चौकशीत डी.जे. रॅपर रोहित वर्माचे नाव समोर आले होते. तो भिवंडी येथे राहत असल्याने त्याच्या अटकेसाठी एनसीबीचे एक पथक तिथे रवाना झाले आहे. रोहित हा काही वर्षांपासून परवेजच्या संपर्कात होता. तसेच त्याच्यासाठी एमडी ड्रग्जची विक्री करीत होता. दुसरीकडे या कारवाईपूर्वी आरिफ पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी एनसीबीने विशेष मोहीम सुरु केली आहे. तो विदेशात पळून जाऊ नये, म्हणून लवकरच त्याच्याविरुद्ध एलओसी जारी करण्यात येणार आहे. अटकेनंतर परवेजसह इतरांना नवी मुंबईतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे.


हेही वाचा – विना पासपोर्ट वास्तव्य करणाऱ्या १४ नायजेरियन नागरिकांना अटक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -