ऑडी चालविणाऱ्या मुलीने बाईकस्वाराला दिली धडक; मुलाचा मृतदेह उडाला थेट गच्चीवर

jaipur audi car accident
जयपूर येथील भीषण अपघात

राजस्थानची राजधानी जयपूर येथे एक धक्कादायक आणि विचित्र अपघाताची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी वेगाने धावणाऱ्या ऑडी गाडीने एका बाईकस्वाराला जोरदार धडक दिली, ज्यामध्ये बाईकवरील मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. ऑडी Q7 या महागड्या गाडीने धडक दिल्यानंतर बाईकस्वार युवक पुलावरुन ३० फूट उंच उडून एका घराच्या छतावर जाऊन पडला. या अपघातात युवकाचा पाय जागीच कापला गेला होता. अपघातानंतर ऑडी गाडीचा फोटो पाहून हा अपघात किती भीषण आणि भयानक होता याची प्रचिती येते. धडक बसल्यानंतर ऑडी गाडीतील एअर बॅग खुल्या झाल्या, त्यामुळे दोन्ही तरुणी वाचल्या. मात्र गाडीचे प्रचंड नुकसान झाले.

मृत तरुण हा पाली जिल्ह्यात राहणारा होता, असे सांगण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा तरुण पोलीस दलाची परिक्षा देण्यासाठी जात होता. मात्र त्याच्या स्वप्नावर काळाने घाला घातला. अपघातानंतर ऑडी चालविणाऱ्या दोन तरुणींना पोलिसांनी सोडून दिले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे दोन्ही तरुणींविरोधात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. युवकाचे कुटुंबिय जेव्हा पाली येथून जयपूरला येतील तेव्हा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.