वसईत दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू, २ वर्षाचा मुलगा बचावला

दोन वर्षाचा मुलगा असून तो सुखरूप असून त्याचा तात्पुरता ताबा नातेवाईकाकडे देण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Suspicious death of couple in Vasai, 2 year old son rescued
वसईत दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू, २ वर्षाचा मुलगा बचावला

वसई शहरातील भोइडापाडा येथे एका दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. या दाम्पत्याचा मृत्यू विषबाधेमुळे झाला असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी तपास सुरु असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक गोविंद करोडीवाल यांनी दिली आहे. या दाम्पत्याला दोन वर्षाचा मुलगा असून तो सुखरूप असून त्याचा तात्पुरता ताबा नातेवाईकाकडे देण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विष्णू पटेल (२८) आणि प्रतिभा पटेल (२२) असे या दाम्पत्याची नावे असून त्यांना २ वर्षांचा मुलगा आहे. हे दाम्पत्य उत्तरप्रदेश राज्यातून वसई येथील भोइडापाडा येथे राहण्यास होते. घरापासून काही अंतरावरच असलेल्या एका प्लास्टिक कारखान्यात विष्णू पटेल मशीन ऑपरेटरची नोकरी करीत होता. मात्र लॉकडाऊनमध्ये कारखाना बंद असल्यामुळे तो घरीच होता. लॉकडाऊन मध्ये कामधंदा नसल्यामुळे या दाम्पत्याची परिस्थिती हलाखीची झाली होती. मागील आठवड्याभरापासून या दाम्पत्याला आणि त्यांच्या दोन वर्षांच्या मुलाला उलटी जुलाबाच्या त्रास होत होता. औषधउपचार न घेता या दाम्पत्यांनी हा आजार अंगावर काढला. शेजाऱ्यांनी त्यांना अनेक वेळा रुग्णलयात जाण्याचा सल्ला दिला होता. दोघांनी एकदा औषधे आणली होती. त्यातून देखील त्यांना काहीच फरक पडला नव्हता.

सोमवारी सकाळी या दाम्पत्याचा घरातून लहान मुलाचा रडण्याचा आवाज येऊ लागल्यामुळे शेजाऱ्यांनी बाहेरून हाक मारली मात्र आतून दार उघडत नसल्यामुळे शेजाऱ्यांनी दार तोडून आत प्रवेश केला असता पटेल दाम्पत्य बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांच्या शेजारी दोन वर्षाचा मुलगा रडत बसला होता. शेजाऱ्यांनी ताबडतोब त्यांना वसई येथील मनपा रुग्णलयात दाखल केले. दोघांवर उपचार सुरु असताना मंगळवारी रात्री प्रतिभाचा मृत्यू व दुसऱ्याच दिवशी विष्णू याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच वालीव पोलिसांनी या दाम्पत्याच्या घरी धाव घेऊन घराचा पंचनामा केला असता घरात बुरशी लागलेले अन्न तसेच डॉक्टरांकडून आणलेली औषधे या व्यतिरिक्त काहीही मिळाले नाही. प्राथिमिक तपासावरून या दाम्पत्याना शिळे अन्न खाल्ल्यामुळे विषबाधा झाली असावी असा अंदाज लावण्यात येत आहे. दाम्पत्याचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचा प्राथमिक अहवाल डॉक्टरांनी पोलिसांना दिला असून या दाम्पत्याचा व्हिसेरा काढण्यात आला असून तो तपासणीसाठी कलीना येथील फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आला असल्याचे वालिव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद करोडीवाल यांनी आपलं महानगरशी बोलताना सांगितले. या अहवालानंतरच या दाम्पत्याच्या मृत्यूचे कारण कळू शकेल असेही पोलिसांनी सांगितले.


हेही वाचा – फटाक्यांवरून झाले भांडण, मुलाला वाचवायला गेलेल्या आईने गमावले प्राण