Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम मुंबईत मोठी कारवाई; ७० लाखांचे ड्रग्स जप्त   

मुंबईत मोठी कारवाई; ७० लाखांचे ड्रग्स जप्त   

आझाद मैदान युनिटचे अमली पदार्थ विरोधी पथक आणि कांदिवली युनिटच्या गुन्हे शाखेच्या कारवाईत यश मिळाले.   

Related Story

- Advertisement -

मस्जिद बंदरवरून ४० लाख रुपयांच्या चरससह दोघांना आझाद मैदान युनिटच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. धर्मेंद्र मिश्रा आणि राहुल दसरतलाल शर्मा अशी या दोघांची नावे आहेत. तसेच कांदिवली युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी तडीपार गुन्हेगाराला ३० लाख रुपयांच्या एमडीसह अटक केली. जॉन डेव्हिड जोसेफ असे या गुन्हेगाराचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी ३०० ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.

आझाद मैदान युनिटच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईत मस्जिद बंदरवरून ४० लाख रुपयांच्या चरससह दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांकडून पोलिसांनी एक किलो २०० ग्रॅम वजनाचा चरस साठा जप्त केला आहे. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मस्जिद बंदर येथील वाडीबंदर, कल्याण स्ट्रीटजवळ काही तरुण चरसची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती आझाद मैदान युनिटच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. त्यामुळे या अधिकार्‍यांनी साध्या वेशात तिथे पाळत ठेवली. मंगळवारी रात्री उशिरा तिथे एक तरुण दुसर्‍या तरुणाला जांभळ्या रंगाची कापडी पिशवी देत होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच या दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. या पिशवीची तपासणी केल्यानंतर त्यात पोलिसांना एक किलो २०० ग्रॅम वजनाचे चरस सापडले. या चरसची किंमत सुमारे ४० लाख रुपये आहे.

- Advertisement -

दुसरीकडे कांदिवली युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना मोठे यश मिळाले असून त्यांनी तडीपार गुन्हेगाराला सुमारे ३० लाख रुपयांच्या एमडीसह अटक केली. जॉन जोसेफ नामक या गुन्हेगाराकडून पोलिसांनी ३०० ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून पोलीस उपनिरीक्षक तानाजी पाटील या गुन्ह्यांचा तपास करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. जॉनला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी मुंबईसह ठाणे शहरातून एक वर्षासाठी तडीपार केले होते. त्याच्यावरील ही कारवाई सुरु असतानाही तो मालाड परिसरात एमडी ड्रग्ज विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून जॉनला शिताफीने अटक केली. जॉन हा वसई येथे राहत असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

- Advertisement -