‘माझ्या मुलांना तरी थकलेला पगार द्या’, ३ वर्ष पगार नाही म्हणून FB Live करत तरुणाची आत्महत्या

हरियाणाच्या हिस्सार येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण ऐकून अनेकांना धक्काच बसला. तीन वर्षांपासून पगार न झाल्यामुळे नैराश्यातून पवनने हे टोकाचे पाऊल उचलले होते. ट्रक ड्रायव्हर असलेल्या पवनने लाईव्ह व्हिडिओमध्ये पंख्याला दोरी बांधली, खुर्चीवर उभा राहिला आणि पायाने खुर्ची बाजुला देखील केली. काही सेकंदातच पवनने आपला प्राण सोडला. पवनचे फेसबुकवर पौनी बिश्नोई या नावाने अकाऊंट होते. आत्महत्येच्या व्हिडिओमध्ये चार लोकांना जबाबदार धरले आहे. या लोकांची आता पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.

पवनच्या नातेवाईंकानी पोलिसांना सांगितले की, पवन मागच्या ३-४ वर्षांपासून एका थर्मल प्लांटमध्ये काम करत होता. या प्लांटच्या ट्रक चालविण्याचे काम त्याच्याकडे होते. मात्र कंपनीच्या मालकांनी त्याचे मानसिक आणि शारीरिक छळ करत होते. जर पवनने नोकरी सोडली तर त्याचा थकलेला पगार देणार नाही, अशी धमकी दिली होती. पैसे नसल्यामुळे तो तणावात होता. मागच्या ६-७ दिवसांपासून तो घरातच होता. शनिवारी रात्री ११ वाजता त्याने फेसबुकवर लाईव्ह व्हिडिओद्वारे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा नातेवाईकांनी मध्यस्थी करत त्याला आत्महत्या करण्यापासून रोखले आणि त्याची खूप समजूत काढली. मात्र सकाळी ४ वाजता त्याने पुन्हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ज्यात त्याचा मृत्यू झाला.

पवन विवाहित असून त्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे. लाईव्ह व्हिडिओमध्ये पवनने पुरुषोत्तम नावाच्या व्यक्तिचा उल्लेख केला. मृत्यूपुर्वी त्याने सांगितले होते की, त्याला तीन वर्षांपासून पगार दिलेला नाही. तसेच त्याचा छळ केला जात आहे. पवनच्या मृत्यूनंतर भडकलेल्या नातेवाईंकानी सिरसा चंदिगढ येथील हायवेवर आंदोलन केले. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

माझ्या मुलांना तरी आता पगार द्या

मृत्यूपुर्वी पवनने पुरुषोत्तमचे नाव घेत सांगितले की, तू मला जिवंत असताना तरी पगार नाही दिलास. आता माझ्या मृत्यूनंतर तरी माझ्या मुलांना थकलेला पगार दे. मी तुझ्यामुळे मरणाला कवटाळतोय. हे बोलताना पवन पुन्हा पुन्हा रडत होता. पोलिसांना मी तक्रार दिली, मात्र पोलिसांनीही काहीही केले नाही. त्यानंतर पवनने सर्वांना बाय बाय केले. त्यानंतर त्याने बेडवरील बेडशीट काढून त्याचा फास बनविला आणि पंख्याला बांधून त्यावर लटकला. तोड्या वेळाने त्याचे शरिर निपचित पडले. फेसबुक लाईव्हमध्ये हे सर्व दिसत होते.