घरदेश-विदेशमृत्यूनंतरही मायकल जॅक्सन कमावतोय बक्कळ पैसा

मृत्यूनंतरही मायकल जॅक्सन कमावतोय बक्कळ पैसा

Subscribe

हॉलीवूडमधील काही कलाकार मृत पावल्यानंतरही पैसे कमावत असून यामध्ये सर्वात जास्त पैसे कमावणाऱ्यांच्या यादीत पहिलं नाव आहे ते पॉपकिंग मायकल जॅक्सन याचं. फोर्ब्सने याची यादी जाहीर केली आहे.

जगामध्ये बर्‍याच गोष्टी घडत असतात. आतापर्यंत आपण जिवंत माणसं नक्की किती कमावतात किंवा त्यांची किती संपत्ती असते, कोणाकडे बक्कळ पैसा आणि कोण आहे पहिल्या नंबरवर याच्या बातम्या अगदी रस घेऊन वाचत असतो. पण तुम्हाला जर सांगितलं की, मृत्यूनंतरही माणसं अमाप पैसा कमावत आहेत आणि अशा माणसांचीही यादी आहे, तर नक्कीच तुम्हाला धक्का बसेल ना? पण असं आहे. नुकतंच फोर्ब्स या जगप्रसिद्ध मॅगझिननं मृत्यूनंतरही कमाई करत असणार्‍या सेलिब्रिटींची एक यादीच प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये सर्वात वर अर्थात पहिल्या नंबरला नाव आहे ते म्हणजे पॉपकिंग मायकल जॅक्सन अर्थात एमजे याचे. तर दुसर्‍या स्थानावर १९७७ मध्ये मृत पावलेला एल्व्हिस प्रिस्ले आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या यादीमध्ये दहापैकी पाच व्यक्ती या संगीत क्षेत्रातीलच आहेत.

काय आहे फोर्ब्सची यादी?

फोर्ब्स या जगप्रसिद्ध मासिकाने नुकतीच मृत झालेले मात्र त्यानंतरही कमावणार्‍या सेलिब्रिटीजची यादी जाहीर केली. यामध्ये सर्वात वर क्रमांक आहे तो मायकल जॅक्सनचा. फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, २००९ मध्ये मरण पावल्यानंतर आजपर्यंतच्या ९ वर्षांमध्ये जॅक्सनच्या नावे २.४ बिलियन डॉलर्स अर्थात १७,११० कोटी इतकी कमाई झाली आहे. केवळ २०१८ या वर्षातच एमजेच्या नावे ४०० मिलियन डॉलर्स अर्थात २९३५ कोटी इतके रूपये जमा झाले आहेत. तर दुसर्‍या स्थानावर असलेल्या एल्व्हिस प्रिस्लेचा मृत्यू होऊन ४० वर्षाचा कालावधी लोटला आहे. इतक्या वर्षानंतरही अजूनही त्याच्या नावे प्रत्येक वर्षी जवळपास १० लाख अल्बम्स विकले जातात. त्यामुळे वर्षाकाठी साधारण ४० मिलियन डॉलर्स अर्थात २९३ कोटी रूपये इतकी त्याची कमाई होत आहे. दरम्यान या यादीमध्ये तिसर्‍या स्थानावर गोल्फर अर्नाल्ड पामर असून त्यांची कमाई ३५ मिलियन डॉलर्स, चौथ्या स्थानावर कार्टूनिस्ट चार्ल्स यांची कमाई ३४ मिलियन डॉलर्स आहे. पाचव्या क्रमांकावर संगीतकार बॉब मार्ले असून २०१८ वर्षात २३ मिलियन डॉलर्स अर्थात १६८ कोटी रूपये त्यांनी कमावले आहेत. तर हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मर्लिन मन्रोला आठवे स्थान मिळाले असून तिची कमाई १४ मिलियन डॉलर्स अर्थात १०२ कोटी रूपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -