केदारनाथमध्ये बेपत्ता झालेल्या ३ हजार मृतदेहांचा शोध घेण्यासाठी १० पथक तयार

10 squads formed to search for 3,000 missing bodies

उत्तराखंडमधील केदारनाथ येथे २०१३ साली आलेल्या प्रलयाने संपूर्ण देश हादरुन गेला होता. या आपत्तीमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला होता, तर हजारो जण बेपत्ता झाले. बेपत्ता झालेले अद्याप भेटलेले नाहीत. दरम्यान, उत्तराखंड पोलिसांनी बेपत्ता आणि मृत्यू झालेल्या लोकांच्या मृतदेहाची पुन्हा शोध मोहिम सुरू केली असून डीएनए चाचणीनंतर त्यांचे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सात दिवस ही मोहीम चालणार आहे. सखोल शोध मोहिमेसाठी पोलिसांची दहा पथकं तयार करण्यात आली आहेत. सांगाडा शोधण्यासाठी सरकारने गेल्या सहा वर्षांत अनेक शोध मोहीम राबवल्या असून त्यामध्ये ७०० हून अधिक सांगाडे सापडले आहेत, तर ३००० हून अधिक लोकांचे मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत.

२०१३ ला आलोल्या महाप्रलया वेळी भारतीय सैन्य आणि पोलिसांनी रेस्क्यू ऑपरेशनच्या मदतीने हजारो लोकांना वाचवलं होतं. बचाव पथकांना चार हजाराहून अधिक मृतदेह सापडले, परंतु ३७०० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. अनेक वेळा शोध मोहीम राबविली गेली, ज्यात पोलिसांना ७०० मृतदेहांचा शोध लागला. आजपासून पोलीस पुन्हा एकदा सांगाड्यांचा शोध सुरू करत आहेत. यासाठी पोलीस आणि एसडीआरएफतर्फे दहा पथकांच्या माध्यमातून शोध मोहीम राबविली जाईल. स्थानिक रहिवाशांचंही सहकार्य मिळेल.

या पथकात रुद्रप्रयाग, चमोली आणि पौरी गढवाल येथील सात उपनिरीक्षक आणि २० कॉन्स्टेबल, एसडीआरएफचे तीन उपनिरीक्षक, एक मुख्य कॉन्स्टेबल आणि १९ कॉन्स्टेबल यांचा समावेश आहे. तसंच, रुद्रप्रयाग जिल्ह्यातील १० फार्मासिस्टही या पथकात आहेत. प्रत्येक पथकात उपनिरीक्षकासह दोन पोलीस व एसडीआरएफ कॉन्स्टेबल आणि एक फार्मासिस्ट ठेवण्यात आले आहेत. स्लीपिंग बॅगसह व्हिडिओग्राफीसाठी टीमला सुरक्षा उपकरणे आणि कॅमेरे देण्यात आले आहेत. आयजी गढवाल अभिनव कुमार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही मोहीम राबविली जात आहे. जे काही शरीर किंवा सांगाडा मिळेल त्याचे डीएनए तपासल्यानंतर संबंधित लोकांना कळविले जाईल.