तर मसूद अझहरला मारुन दाखवा; साध्वी यांना आव्हान

२६/११ हल्ल्यात शहीद झालेले एटीएस चीफ हेमंत करकरे यांच्या संदर्भात साध्वी प्रज्ञा ठाकुर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यावरुन २६/११ हल्ल्यातील पीडित देविका रोटावन संतापली आहे. शहीदांच्या बाबतीत चुकीचं वक्तव्य करु नका, असं देविका म्हणाली आहे.

Mumbai
26/11 attack witness anger on Sadhvi Pragya controversial statement
साध्वी प्रज्ञांच्या वक्तव्यावरुन २६/११ पीडितेने व्यक्त केला संताप

‘२६/११ हल्ल्याची जखम अजून भळभळती आहे. या जखमेवर मीठ चोळले जात आहे. जर खरच काही करायचं असेल तर पाकिस्तानात लपून बसलेला मास्टरमाइंड मसूद अझहरला मारुन दाखवा. मात्र, शहिदांच्या बाबतीत असं काही बोलू नका’, असं २६/११ हल्ल्याची पीडित तरुणी म्हणाली आहे. या तरुणीचे नाव देविका रोटावन असं आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने आपला संताप व्यक्त केला आहे.

साध्वींचा श्राप आम्हालाही लागला – देविका

मध्य प्रदेशच्या भोपाळ मतदारसंघाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकुर यांनी २६/११ हल्ल्यात शहीद झालेले एटीएस चीफ हेमंत करकरे यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ‘हेमंत करकरेंना त्यांच्या कर्माची फळे मिळाली. त्यांना संन्यासींचा श्राप लागला होता. त्यामुळे मी ज्या दिवशी जेलमध्ये गेली त्याच्या ४५ दिवसांनंतर अतिरेक्यांनी त्यांची हत्या केली’, असं साध्वी म्हणाल्या. त्यांच्या याच वक्तव्यावर देविकाने संताप व्यक्त केला. देविका म्हणाली की, ‘साध्वीने असा श्राप दिला असेल तर तो श्राप आम्हीलाही लागला असेल. अतिरेक्यांशी तुमचं काही नातं होतं का ज्यातून तुमचा काही फायदा झाला होता? २६/११ हल्ल्यात निर्दोष लोकांचा मृत्यू झाला. या लोकांना त्याचा आनंद होत आहे. करकरे यांनी या देशासाठी बलिदान दिले. त्यांच्याबाबत अशा प्रकारचे वक्तव्य करणं चुकींचं आहे.’

कोण आहे देविका रोटावन?

२६/११ हल्ल्यात देविका रोटावनच्या पायाला बंदूकीची गोळी लागली होती. त्यावेळी देविका फक्त १० वर्षांची होती. त्यादिवशी देविका आपला लहान भाऊ आणि वडिलांसोबत पुण्याला जाणार होती. त्यामुळे ती बांद्रा येथून सीएसटी रेल्वे स्थानकावर आली होती. दरम्यान, रेल्वे स्थानकावर अचानक गोळीबार सुरु झाला. लोकांचा रडण्याचा, किंचाळण्याचा आवाज ऐकू आला. त्यामुळे देविकाही आपल्या वडिलांसोबत पळायला लागली. परंतु, अचानक तिच्या पायाला गोळी लागली. यात ती गंभीर जखमी झाली. सुप्रीम कोर्टात तिने दिलेल्या साक्षला जास्त महत्त्व दिलं गेलं होतं. कारण कसाब विरोधात साक्ष देणारी ती सर्वात लहान मुलगी होती.