भाजप-सेनेचे २४ खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे; उदयनराजेंवर सर्वाधिक गुन्हे

सतराव्या लोकसभेत महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या ४८ खासदारांपैकी २८ खासदारांवर गुन्हे दाखल आहेत.

प्रातिनिधिक छायाचित्र

नुकतेच लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, यामध्ये भाजपाचे २३, शिवसेनेचे १८, राष्ट्रवादी काँग्रेस ५, काँग्रेसचा १ आणि वंचित आघाडीचा १ खासदार निवडून आला आहे. भाजपा-शिवसेनेचे सर्वाधिक ४१ खासदार निवडून दिल्लीत गेले आहेत. मात्र तुम्हाला माहिती आहे का निवडून गेलेल्या ४८ खासदारांपैकी २८ खासदारांवर विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

या खासदारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रिज्ञापत्रात आपल्यावरील गुन्ह्याचा तपशील दिला आहे. महाराष्ट्र इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) ने याबाबतचा अहवाल दिला आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे यातील १५ खासदारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून त्यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, धमकावणे असा स्वरुपाच्या गुन्ह्यांचा समावेश असल्याचे ‘एडीआर’ने आपल्या अहवालात म्हटले आहे.

पक्षनिहाय गुन्हे दाखल असलेल्या खासदारांची आकडेवारी 

भाजपा – १३
शिवसेना – ११
राष्ट्रवादी काँग्रेस – १
काँग्रेस – १
एमआयएम – १ 
इतर – १

गंभीर गुन्हे दाखल असलेल्या खासदारांची आकडेवारी

भाजपा – ६
शिवसेना – ५
राष्ट्रवादी – १
एमआयएम – १

उदयनराजेंवर सर्वाधिक गुन्हे दाखल

दरम्यान एकंदरीत एडीआरने दिलेल्या अहवालावर नजर टाकली असता सातऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर सर्वाधिक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे १७ आणि किरकोळ स्वरुपाचे ४४ गुन्हे दाखल आहेत. या सर्व गुन्ह्यांची माहिती त्यांनी आपल्या पतिज्ञा पत्रात दिली आहे. त्यानंतर भाजपाचे गोपाळ शेट्टी, शिवसेनेचे राजन विचारे यांचा नंबर लागतो. गोपाळ शेट्टी यांच्यावर गंभीर स्वरुपाचे २ तर किरकोळ स्वरुपाचे २९ गुन्हे नोंद असून, राजन विचारे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे सात आणि किरकोळ स्वरुपाचे १६ गुन्हे दाखल आहेत.

यादीत गडकरींचाही समावेश

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे एडीआरने दिलेल्या अहवालात नितीन गडकरी यांचा देखील समावेश असून, त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे ५ आणि किरकोळ स्वरुपाचे पाच गुन्ह्यांची नोंद आहे. तर यामध्ये यादीमध्ये महिला खासदारांचा देखील समावेश  असून, पुनम महाजन, प्रितम मुंडे आणि भावना गवळी यांच्यावर देखील गुन्हे दाखल असल्याचे अहवालात म्हटले आहे. तर लोकसभेत पहिल्यांदाच निवडून गेलेल्या नवनीत कौर राणा यांच्यावर देखील एक गुन्हा दाखल झालेला आहे.