घरदेश-विदेशव्हीव्हीपॅटच्या ५.३८ कोटी चिठ्ठ्या नष्ट करण्यात येणार

व्हीव्हीपॅटच्या ५.३८ कोटी चिठ्ठ्या नष्ट करण्यात येणार

Subscribe

निवडणूक आयोगाची गुप्त मोहीम

महाराष्ट्रात यंदा लोकसभा निवडणुकीत ५ कोटी ३८ लाख ४५ हजार १९७ मतदारांनी मतदान केले. संपूर्ण राज्यात पहिल्यांदाच व्हीव्हीपॅटचा उपयोग करण्यात आला. पण आता या व्हीव्हीपॅट मशीनच्या माध्यमातून तयार झालेल्या मतदाना इतक्याच म्हणजे ५ कोटी ३८ लाख ४५ हजार १९७ इतक्या पावत्या नष्ट केल्या जाणार आहेत. लवकरच या थर्मल प्रिटेंड पावत्या नष्ट करण्यासाठी गुप्त मोहीम राबवण्यात येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून मिळाली आहे.

सध्या सगळ्या ईव्हीएम मशीन्स तसेच व्हीव्हीपॅट मशीन निवडणूक आयोगाकडून स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. उमेदवारांना ४५ दिवस संपूर्ण मतदान प्रक्रियेविरोधात अपिल करता येते, तोपर्यंत हा सगळा ईव्हीएम मशीनचा डेटाबेस जपून ठेवण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणूक पाहता ईव्हीएम मशीनचा डेटाबेस रिसेट करण्यात येईल. तर व्हीव्हीपॅट मशीनच्या चिठ्ठ्यांबाबतही तोच नियम लागू करत ४५ दिवसांच्या कालावधीनंतर या चिठ्ठ्या नष्ट करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

त्यासाठीच आयोगाचा सध्या अभ्यास सुरू आहे. लवकरच अतिशय गुप्त पद्धतीने या चिठ्ठ्या नष्ट करण्याची मोहीम हाती घेण्यात येईल. डिजिटल थर्मल प्रिंट असलेल्या व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या हा मतदारांचा अतिशय गुप्त असा डेटा आहे. त्यामध्ये मतदाराने मतदान केलेल्या उमेदवाराची सगळी माहिती आहे. त्यामुळेच ही माहिती लोकशाही प्रक्रियेचा भाग म्हणून गुप्त राहणे आवश्यक आहे, असे राज्य निवडणूक आयोगातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

मतपत्रिकाही नष्ट करण्यात येत होत्या
मतदानासाठी ईव्हीएम वापरात येण्याआधी मतपत्रिकांचा वापर करण्यात येत होता. त्यावेळीही ४५ दिवसांचा कालावधी संपल्यानंतर आयोगाकडून मतपत्रिका नष्ट करण्याची मोहीम घेतली जात असे. मतपत्रिकांच्या कागदाचा लगदा तयार करून तो नष्ट केला जात असे. पण आता व्हीव्हीपॅट मशीनच्या थर्मल प्रिंटच्या चिठ्ठ्यांमुळे त्या नष्ट करण्यासाठी आयोगाकडून विशिष्ट पद्धत अवलंबण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -