UP सरकारवर अजून एक बट्टा; बलात्कार झालेल्या ६ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू!

Rape Case

उत्तर प्रदेश सरकारवर देशभरातून सध्या टीका होत असतानाच उत्तर प्रदेशमधल्याच हथरसमधल्याच बलात्काराच्या दुसऱ्या प्रकरणात पीडित ६ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्यामुळे पुन्हा एकदा देशभरातून त्यावर संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. हथरसमध्ये १९ वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करणाऱ्या ४ नराधमांना पोलिसांनी अटक तर केली आहे. मात्र, यामध्ये पोलीस ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळत आहेत, त्यावरून मोठ्या प्रमाणावर टीकेचा सामना उत्तर प्रदेश पोलिसांना करावा लागत आहे. त्यातच आता हथरसमधलंच हे दुसरं प्रकरण समोर आल्यामुळे त्यात अधिकच भर पडली आहे. या चिमुकलीवर दोन आठवड्यांपूर्वी तिच्याच एका नातेवाईकाने अत्याचार केले होते.

हे प्रकरण अलीगढमधलं असून इग्लास या ठिकाणी या मुलीच्या ओळखीतील एक १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा राहातो. या मुलाने मुलीला एका खोलीत डांबून ठेऊन तिच्यावर अत्याचार केले होते. त्यानंतर एका स्वयंसेवी संस्थेने या संदर्भात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या खोलीवर धाड टाकली. सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांना देखील धक्का बसला होता. या मुलाने चिमुकलीचं अपहरण करून तिला या खोलीत डांबून ठेवलं होतं. तिच्यावर अत्याचार देखील केले. अखेर १७ सप्टेंबर रोजी पोलिसांनी या चिमुकलीची सुटका केली.

सुटका केल्यानंतर मुलीला दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आज उपचारांदरम्यान या चिमुकलीची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात संबंधित १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. या सगळ्या प्रकारात मुलाच्या मावशीचा देखील सहभाग होता. या महिलेच्या शोधासाठी पोलिसांचं एक पथक रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.