घरदेश-विदेशसी व्हिजिल’वर आचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारी

सी व्हिजिल’वर आचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारी

Subscribe

आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास सी व्हिजिल अॅपच्या माध्यमातून थेट ऑनलाइन तक्रार करण्याची सुविधा निवडणूक आयोगामार्फत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कॅमेरा, इंटरनेट कनेक्शन आणि जीपीएस सुविधा असलेल्या स्मार्टफोनद्वारे या अॅपच्या माध्यमातून तक्रार करता येते.

नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ऑनलाईन दाखल करता याव्यात यासाठी निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिलेले सी व्हिजिल (cVigil) मोबाईल अॅप प्रभावी ठरले आहे. या अॅपवर ७१७ तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी तथ्य आढळलेल्या २९४ तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे. या अॅपवर करण्यात आलेल्या तक्रारींपैकी आचारसंहितेचा भंग झाल्याच्या २९४ तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्यात आली आहे. सध्या ३६ तक्रारींवर कार्यवाही सुरु आहे, तर ३८७ तक्रारी या आचारसंहितेशी संबंधित नसल्याने त्यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही. एकूण तक्रारींपैकी सर्वाधिक २३० तक्रारी या विनापरवाना लावण्यात आलेले पोस्टर, बॅनर संदर्भातील आहेत. संपत्ती विद्रुपीकरणाचे ४४, शस्त्रप्रदर्शन किंवा दहशतीचे वातावरणाचे ७, भेटवस्तू किंवा कुपनचे वाटप संदर्भात २२, मद्याचे वाटपचे १८, पैशांच्या वाटपावर ३८, पेड न्यूजवर ४१, धार्मिक किंवा सामाजिक भाषणवर ३, प्रचारफेरीसाठी नागरिकांची वाहतूक संदर्भात ५, निर्धारीत वेळेनंतर ध्वनीक्षेपकाचा वापर ५ तर विनापरवाना वाहनांचा वापर याबाबत १९ तक्रारी अॅपवर नोंदवण्यात आल्या.

काय आहे सी व्हिजिल’ अॅप?

आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास सी व्हिजिल अॅपच्या माध्यमातून थेट ऑनलाइन तक्रार करण्याची सुविधा निवडणूक आयोगामार्फत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कॅमेरा, इंटरनेट कनेक्शन आणि जीपीएस सुविधा असलेल्या स्मार्टफोनद्वारे या अॅपच्या माध्यमातून तक्रार करता येते. आदर्श आचारसंहिता भंग होत असल्याचे वाटल्यास नागरिक त्या घटनेचे छायाचित्र किंवा २ ते ३ मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन अॅपवर टाकू शकतात. अॅप वापरकर्त्यास आपली ओळख लपवून तक्रार नोंदविण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. या प्रणालीस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

- Advertisement -

सर्वाधिक तक्रारी पुण्यातून

अॅपच्या सहाय्याने सर्वाधिक १३३ तक्रारी पुणे जिल्ह्यातून नोंदवण्यात आल्या. त्याखालोखाल ठाणे ६८, सोलापूर ६१, मुंबई उपनगर ४५ तर मुंबई शहर येथे ४१ तक्रारी दाखल झाल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात ३६, अहमदनगर ३५, अकोला ११, अमरावती ११, औरंगाबाद १२, बीड ८, भंडारा २, बुलढाणा १३, चंद्रपूर ३, धुळे २, गडचिरोली २, गोंदीया ३, हिंगोली ७, जळगाव २०, जालना १, कोल्हापूर १८, लातूर ११, नागपूर ३०, नंदूरबार २, नाशिक २२, उस्मानाबाद ८, पालघर २४, परभणी ७, रायगड ८, रत्नागिरी ४, सांगली १७, सातारा ११, सिंधुदूर्ग १९, वर्धा १४, वाशिम ६ तर यवतमाळ जिल्ह्यातून २ तक्रारी नोंदवण्यात आल्या.

असा डाऊनलोड करा सी व्हिजिल मोबाईल अॅप

सी व्हिजिल मोबाईल अॅप हे डाऊनलोडसाठी गुगल प्ले स्टोअर तसेच अॅपल स्टोअरवर उपलब्ध आहे. अॅपवर तक्रार अपलोड केल्यापासून साधारण दीड तासात तक्रारीची स्थिती तक्रारकर्त्याला प्राप्त होते. त्यानंतर तक्रार योग्य असल्यास त्या तक्रारकर्त्याच्या मोबाइलवर तसा संदेश प्राप्त होतो. मतदारांना पैसा, मद्य, अंमली पदार्थांचे वाटप करणे, शस्त्रसाठा अथवा शस्त्रवापर, मतदारांना मारहाण, दमबाजी, चिथावणीखोर भाषण, पेड न्यूज, फेकन्यूज, मतदारांना आमिष म्हणून वस्तूंचा वापर, मतदान केंद्रापर्यंत मतदारांची मोफत वाहतूक, उमेदवाराची मालमत्ता आदी विविध प्रकारच्या आचारसंहिता भंगाच्या प्रकरणात सी व्हिजिल मोबाईल अॅपवर तक्रार करता येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -