घरलोकसभा २०१९ग्राउंड रिपोर्टदिल्ली : आम आदमी पक्षाचे भवितव्य ठरणार

दिल्ली : आम आदमी पक्षाचे भवितव्य ठरणार

Subscribe

लोकसभेसाठी दिल्लीत १२ मे रोजी मतदान होणार आहे. लोकसभेच्या सात जागा असलेले दिल्ली हे राज्य संख्याबळाच्यादृष्टीने कमी महत्त्वाचे असले तरी येथील निकालावर आम आदमी पक्षाचे भवितव्य ठरणार आहे. आम आदमी पक्ष हा दिल्लीपुरता मर्यादीत आहे. त्यामुळे दिल्लीच्या लोकसभेच्या निवडणुकीत आप मोठ्या ताकदीने उतरणार आहे.

२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सातही जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या होत्या. त्याची पुनरावृत्ती यावेळच्या लोकसभा निवडणुकीत करण्याची जोरदार तयारी भाजपने केली आहे, तर दुसर्‍या बाजूला दिल्लीतील आपले अस्तित्व टिकण्याच्या प्रयत्नात काँग्रेस आहे. स्वतंत्ररित्या भाजपला टक्कर देणे अवघड असल्याचे समजल्यामुळे आपचे नेते अरविंद केजरीवाल हे काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी काँग्रेसच्या पायर्‍या झिजवत आहेत.

- Advertisement -

मात्र काँग्रेसने आम आदमी पक्षासोबत जायचे नाही, असे ठरवले असले तरी त्यांचा हा निर्णय कायम टिकेल असे सांगता येत नाही. कारण दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सोडले तर इतर काँग्रेस नेत्यांना आम आदमी पक्षाशी आघाडी व्हावी, असे वाटत आहे. ही आघाडी झाली तर भाजपला लोकसभा निवडणूक अवघड जाणार हे निश्चित. भाजपची मदार ही मोदी आणि त्यांच्या विकासकामांवर आहे.

दुसर्‍या बाजूला दिल्लीतील आम आदमी सरकारविरोधातील अ‍ॅण्टी इन्कम्बन्सी फॅक्टरचा भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीनंतर नऊ महिन्यांतच दिल्लीत विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीनेही ही लोकसभा निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे.

- Advertisement -

लोकसभेसाठी एकूण मतदार
दिल्लीत २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत १ कोटी ३६ लाख ९५ हजार २९१ मतदार मतदान करणार आहेत. त्यापैकी ७५ लाख ५६ हजार १४६ मतदार हे पुरुष आहेत, तर ६१ लाख ३८ हजार ३३५ मतदार या स्त्रीया आहेत. ८१० मतदार किन्नर आहेत. २०१४ सालच्या तुलनेत यावर्षी ९ लाख ८४ हजार १३७ मतदारांची वाढ झाली आहे.

दिल्लीतील मतदारसंघ
१ -चांदणी चौक, २ -ईशान्य दिल्ली, ३ – पश्चिम दिल्ली, ४ – पूर्व दिल्ली, ५ -नवी दिल्ली, ६ -दक्षिण दिल्ली, ७ -आग्नेय दिल्ली

निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे
१) दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा
२) हाऊसिंग, व्यावसायिक आस्थापनांना सील करून ती जमीनदोस्त करणे
३) दिल्ली आणि केंद्र सरकारमधील बेबनाव
४) दिल्लीतील कायदा-सुव्यवस्था

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -