AAP नेत्याची गाडीतच विष प्राशन करुन आत्महत्या

AAP leader nishant tanwar commits suicide

आम आदमी पक्षाचे नेते निशांत तंवर यांनी गाडीतच विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दिल्ली-पानीपत महामार्गावर आपल्या गाडीतच विष प्राशन करुन निशांत तंवर यांनी जीवन संपवलं. काँग्रेसचे नगरसेवक आणि त्यांचे शेजारी संदीप तंवर यांनी निशांत तंवर यांना आत्महत्या करण्यास भाग पाडलं, असा आरोप कुटुंबाने केला आहे. पोलिसांनी नातेवाईकांच्या जबाबावरुन गुन्हा दाखल करुन घेतला आहे.

दिल्ली-पानिपत महामार्गावर एका युवकाने गाडीत विष प्राशन केल्याने गाडीत बेशुद्ध पडल्याचं लोकांना दिसलं. लोकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली आणि तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाची ओळख पटवताना आपचे नेता निशात तंवर असल्याचं समजलं.

निशांत तंवर यांच्या भावाने काँग्रेस नगरसेवक आणि त्यांचे शेजारी संदीप तंवर यांच्यावर आपल्या भावाला आत्महत्येस भाग पाडल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी मृत निशांत तंवरच्या भावाच्या आरोपांनंतर तक्रार दाखल केली आहे. तथापि, संदीप तंवर यांनी चार दिवसांपूर्वी मृत निशांत तंवर, त्यांचा भाऊ आणि आई – वडिलांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. निशांत यांचा भाऊ निशिल तंवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, निशांत आम आदमी पक्षाचा वार्ड – २ चा अध्यक्ष होता. दिल्ली कँटचे नगरसेवक संदीप तंवर यांनी निशांतविरुदध १२ सप्टेंबर रोजी तक्रार नोंदवली होती. निशांत, त्याचा भाऊ निशिल आणि आई-वडिलांविरोधात कलम ३०८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, निशिल यांचं म्हणणं आहे की, संदीप वारंवार कुरापती काढणं, शिवीगाळ करणं अशा प्रकारांनी निशांतला त्रास देत होता. शिवाय, संदीपने दाखल केलेली तक्रारदेखील खोटी असल्याचं म्हटलं आहे. याच दबावाखाली येऊन निशांत यांनी आपलं आयुष्य संपवल्याचा दावा निशांतचा भाऊ निशिलनं केला आहे.