घरदेश-विदेशआप नेत्याला चावला उंदीर, म्हणे 'ही भाजपची खेळी'!

आप नेत्याला चावला उंदीर, म्हणे ‘ही भाजपची खेळी’!

Subscribe

व्हीआयपी गेस्ट हाऊसमध्ये उंदीर चावल्यामुळे हैराण झालेले आम आदमी पार्टीचे नेते सोमनाथ भारती यांनी ही भाजपची खेळी असल्याचा आरोप केला आहे.

सत्ताधारी पक्षावर टीका करणं हे विरोधकांचं कामच असतं असं आपण नेहमी म्हणतो. सरकारी कामांवर नजर ठेवण्याचं काम विरोधक करत असतात. सध्या सत्ताधारी भाजपवर विरोधक चांगलीच टीका करत आहेत. मात्र, त्यातही आम आदमी पक्ष सर्वात आघाडीवर आहे असं म्हणायला हरकत नाही. पण आम आदमी पक्षाची भाजपवर टीका करण्याची पद्धत काही वेगळीच आहे! नुकताच छत्तीसगडमध्ये त्याचा प्रत्यय आला. छत्तीसगडमध्ये एका आपच्या नेत्याला उंदीर चावला. मात्र, ही ‘भाजपचीच खेळी असल्याची’ टीका आपच्या या नेत्याने केली आहे!

व्हीआयपी गेस्ट हाऊसमध्ये उंदीर!

दिल्लीचे माजी कायदा मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सोमनाथ भारती हे २ दिवसांच्या छत्तीसगड दौऱ्यावर आले होते. विलासपूरच्या व्हीआयपी सरकारी गेस्ट हाऊसमध्ये त्यांचा मुक्काम होता. पण सोमनाथ भारतींना रात्री झोप काही लागली नाही. आणि त्याला कारण होतं या गेस्ट हाऊसमधले उंदीर!

- Advertisement -

उंदरांमुळे आख्खी रात्र काढली जागून

रात्री गेस्ट हाऊसमध्ये सोमनाथ भारती झोपलेले असताना अचानक त्यांना पायाजवळ हालचाल झाल्याचं जाणवलं. त्यांनी उठून पाहिलं, तर त्यांना आसपास कुणीही दिसलं नाही. त्यामुळे भारती पुन्हा झोपले. आता त्यांना हाताला कुणीतरी चावल्याचं जाणवलं. सोमनाथ भारतींना काय करावं कळेना. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. पण कार्यकर्ते काही उठेनात! शेवटी त्यांनी नाईलाजाने आख्खी रात्र जागूनच काढली. सकाळी उठल्या उठल्या त्यांनी कार्यकर्त्यांसोबत उंदीर पकडण्याची मोहीमच सुरू केली.

उंदरांच्या माध्यमातून हल्ला!

दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर सोमनाथ भारतींनी ‘ही सगळी भाजपचीच खेळी’ असल्याचा आरोप केला. ‘भाजप प्रत्यक्षपणे आमचा सामना करू शकत नाही. त्यामुळेच अप्रत्यक्षपणे उंदरांच्या माध्यमातून आमच्यावर हल्ला केला गेला’, असा अजब आरोप त्यांनी केला. त्यामुळे आता इतर सर्व विषयांसोबतच उंदीरही राजकारणाचा अप्रत्यक्षपणे भागच झालेत असं बोललं जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -