‘मोदीजी, यावेळी तुम्ही चुकलात!’, अभिनेत्याची पंतप्रधानांवर टीका!

Chennai
Prime Minister narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ मार्च रोजी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर संपूर्ण देशभरातली सर्व व्यवस्था बंद पडली. फक्त जीवनावश्यक वस्तू आणि सेवांचा पुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन गरजेचंच होतं असं जवळपास सगळ्यांनीच सांगितलं आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लॉकडाऊनवर टीका केल्यानंतर आता एक अभिनेता देखील मोदींच्या विरोधात उभा राहिला आहे. ‘नोटबंदीच्या वेळी जी चूक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती, तीच चूक मोठ्या प्रमाणावर आत्ता लॉकडाऊनच्या माध्यमातून समोर येतेय की काय, अशी भिती मला आहे’, असा थेट आरोप या अभिनेत्यानं केला आहे. चेन्नईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते आणि मक्कल निधी मईयम या पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनी ही टीका केली आहे.

काय म्हणाले कमल हसन?

लॉकडाऊनवर टीका करताना कमल हसन म्हणाले, ‘देशभरात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन हा एक नियोजनशून्य निर्णय होता. त्यामुळे देशभरातल्या गरीबांना आणि मागासलेल्या वर्गाला मोठ्या संकटात सोडलं आणून सोडलं आहे आणि आधीच सुस्थितीत असलेल्या मध्यम वर्गाला अधिक सुरक्षित करून ठेवलंय’, असं कमल हसन म्हणाले आहेत. आपली बाजू मांडण्यााठी कमल हसन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन पानांचं एक पत्रच लिहिलं आहे.

देशातल्या गरीबांना तुमच्याशिवाय दुसरं कुणीही नाही. एकीकडे तुम्ही देशातल्या सुस्थितीत असलेल्या वर्गाला सांगता की लाईट बंद करून दिवे लावा. पण दुसरीकडे गरीबांच्या आयुष्याच एक आशेचा किरण देखील नाही. जेव्हा तुमचं जग बाल्कनीमध्ये तेलाचे दिवे जाळत होतं, तेव्हा देशातले गरीब त्यांचं पुढचं जेवण बनवण्यासाठी तेल कसं जमवायचं? या विवंचनेत होते’, असं देखील कमल हसन यांनी या पत्रात म्हटलं आहे.

‘बाल्कनी सरकार हवंय का?’

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिवे लावण्याच्या आवाहनावर बोलताना कमल हसन यांनी पत्रामध्ये खोचक टीका केली आहे. ‘मला खात्री आहे की तुम्हाला समाजातल्या गरीबांकडे दुर्लक्ष करणारं बाल्कनीतल्या लोकांचं बाल्कनी सरकार नक्कीच नको असावं. देशातला हा गरीब समाज देशाच्या उभारणीतला सर्वात मोठा घटक आहे. आपला मध्यमवर्ग, उच्च मध्यम वर्ग आणि उच्चभ्रू वर्ग ज्यावर आपले महाल उभे करतो, त्याचा पाया हा गरीब समाज आहे. आणि इतिहासानं हे नेहमीच सिद्ध केलं आहे की जेव्हा कधी कुणी पाया उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे, तेव्हा वरची इमारत कोसळून पडली आहे’, असं देखील या पत्रामध्ये नमूद केलं आहे.