Video: जखमी मजूर महिलेला पोलिसांनी पाठीवरुन केले रुग्णालयात दाखल

मध्य प्रदेशातील जबलपूर येथे एका पोलीस कर्मचाऱ्यांनी अपघातात जखमी झालेल्या मजूर महिलेला पाठीवर उचलून रुग्णालयात दाखल केल्याचा सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Video: जखमी मजूर महिलेला पोलिसांनी पाठीवरुन केले रुग्णालयात दाखल

मध्य प्रदेशमध्ये एका पोलिसांनी कौतुकास्पद अशी कामगिरी केली आहे. मध्य प्रदेशातील जबलपूर येथे एका पोलीस कर्मचाऱ्यांनी अपघातात जखमी झालेल्या मजूर महिलेला पाठीवर उचलून रुग्णालयात दाखल केल्याचा सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. पोलिसाच्या या कामगिरीचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही कौतुक केले असून सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. तसेच या पोलिसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

नेमके काय घडले?

मध्य प्रदेशातील जबलपूरपासून ३५ किमी अंतरावर घुघरी गावाजवळ एका ट्रकचा अपघात घडला. या अपघातात ट्रक दरीत कोसळला, यामध्ये ३६ मजूर प्रवास करीत होते. या भीषण अपघातात २७ लोक गंभीर जखमी झाले. या जखमींमध्ये १२ वर्षापासून ६० वर्षांपर्यंतच्या लोकांचा समावेश होता. या सर्वांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सर्व प्रवाशांना एकावेळी उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करणे देखील तितकेच महत्त्वाचे होते. मात्र, यासाठी स्ट्रेचरही उपलब्ध नव्हते. यावेळी चरगवा पोलीस ठाण्याचे एएसआय संतोष सेन यांनी हिम्मत दाखवत जखमींना खांद्यावर उचलून घेत रुग्णालयापर्यंत पोहोचवले. यावेळी त्यांच्या सहकारी पोलिसांनीही त्यांना साथ दिली आणि इतर जखमींना उचलून घेत रुग्णालयात पोहोचवले.

विशेष म्हणजे या पोलिसाचे वय ५७ वर्षे आहे. तर आश्चर्याची बाब म्हणजे २००६ मध्ये एका मोठ्या अपघातात ते जखमी झाले होते. १४ वर्षांपूर्वी नरसिंहपूरमध्ये पवन यादव नामक एका गुंडानं त्यांच्या उजव्या खांद्यावर गोळी मारली होती. त्यामुळे त्यांचा उजवा हाथ व्यवस्थित काम करत नाही. मात्र, तरीही त्यांनी दाखवलेल्या या शौर्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी त्यांना सलाम केला आहे.

‘एएसआय संतोष सेन यांच्यावर संपूर्ण मध्य प्रदेशला गर्व आहे. संतोष सेन हे तरुण पोलीस कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांच्यासारखे लोक समाजाला दिशा देण्याचे काम करतात. मी त्यांच्या शौर्याला प्रणाम करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो, हार्दिक अभिनंदन करतो.’ – शिवराजसिंह चौहान; मुख्यमंत्री


हेही वाचा – मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला १० वर्षांचा कारावास!