ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण ; मध्यस्ती ख्रिस्तीयन मिशेलला CBI कोठडी

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील मध्यस्ती ख्रिस्तीयन मिशेलला ५ दिवसांची CBI कोठडी ठोठावण्यात आली आहे. दिल्लीतील सीबीआय कोर्टानं हा निकाल दिला आहे.

Delhi
christian michel

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील मध्यस्ती ख्रिस्तीयन मिशेलला ५ दिवसांची CBI कोठडी ठोठावण्यात आली आहे. दिल्लीतील सीबीआय कोर्टानं हा निकाल दिला आहे. युपीए -२च्या काळात झालेल्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टरच्या खरेदीमध्ये कथित घोटाळ्याचा आरोप झाला होता. त्यानंतर २०१४ साली हा व्यवहार रद्द करण्यात आला. या प्रकरणामध्ये ख्रिस्तीयन मिशेल हा मध्यस्ती होता. मंगळवारी रात्री ख्रिस्तीयन मिशेलला चार्टर्ड विमानानं भारतात आणण्यात आले. सकाळी त्याला दिल्लीतील सीबीआयच्या विशेष कोर्टासमोर हजर करण्यात आले. यानंतर न्यायालयानं ख्रिस्तीयन मिशेलची रवानगी सीबीआय कोठडीमध्ये केली. फेब्रुवारी २०१७ मध्ये ख्रिस्तीयन मिशेल युएईनं पोलिसांनी अटक केली. त्यानंतर नोव्हेंबर २०१८ मध्ये ख्रिस्तीयन मिशेलच्या प्रत्यार्पणाची विनंती सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाने संयुक्त अरब अमिरातमधील न्यायालयामध्ये केली होती. भारताची विनंती मान्य करत युएईनं ख्रिस्तीयन मिशेलला भारताच्या हवाली केलं.

वाचा – ‘आता बघतोच कसे वाचता ते’, मोदींचा गांधी परिवाराला इशारा

काय आहे ऑगस्टा वेस्टलँड खरेदी प्रकरण

देशातील अतिमहत्वाच्या व्यक्तिंसाठी ३ हजार ६०० कोटी रूपये खर्च करून १२ हेलिकॉप्टर्सची खरेदी केली जाणार होती. इटलीच्या सरकारी मालकीच्या फिनमेकॅनिका या कंपनीची उपकंपनी असलेल्या ऑगस्टा वेस्टलँड या कंपनीकडून एडब्ल्यू १०१ जातीची १२ हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार २०१० साली करण्यात आला होता. यामधील ८ हेलिकॉप्टर्स राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच इतर अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंसाठी वापरली जाणार होती. तर उर्वरित ४ इतर कारणांसाठी वापरली जाणार होती. पण, देशातील विविध लोकांना ३६० कोटी लाच दिल्याचा आरोप झाला. त्यानंतर हा व्यवहार १ जानेवारी २०१४ रोजी रद्द करण्यात आला.  या प्रकरणी माजी हवाई दलप्रमुख एस.पी. त्यागी यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हाही दाखल केला होता. यामध्ये सोनिया गांधींसह माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, तत्कालीन परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी, तत्कालीन प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायण, काँग्रेस नेते अहमद पटेल आणि वीरप्पा मोईली यांची देखील नावं आली होती.

वाचा – ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील ‘त्याला’ भारतात आणणार

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here