लव जिहाद कायदा संविधानविरोधी – असदुद्दीन ओवैसी यांचा भाजपवर आरोप

asaduddin owaisi on france terror attack in mohammad paigambar cartoon controversy
MIM पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी

मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या भाजपशासित राज्यांनी लव जिहाद विरोधातील कायदा आणण्याची तयारी सुरु केली आहे. यावर एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. लव जिहादवरील कायदा आणणाऱ्यांनी आधी भारतीय संविधान वाचावे, असा सल्ला देखील ओवैसी यांनी दिला आहे. ओवैसी यांनी सांगितले की, अशा प्रकारचा कायदा हा संविधानातील अनुच्छेद १४ आणि २१ चे उल्लंघन करणारा आहे. भाजप पक्ष सांप्रदायिक वाद पसरविण्याचा प्रयत्न करत असून हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी हा वाद पसरविण्यात असल्याचा आरोप ओवैसी यांनी केला.

ओवैसी म्हणाले की, “लव जिहादचा कायदा आणला तर ते संविधानातील अनुच्छेद १४ आणि २१ चे उल्लंघन असेल. जर असा कायदा आणायचा असेल तर स्पेशल मॅरेज Act हा कायदा बरखास्त करावा लागेल. भाजपकडून हेतूपरस्पर तिरस्काराचा प्रचार सुरु आहे. खरंतर बेरोजगार असलेल्या तरुणांचे लक्ष वळविण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र आता हा प्रचार काम करणार नाही.” ओवैसी पुढे म्हणाले की, जर भाजपच्या नेत्यांना तुम्ही रात्री जागे करुन काहीही विचारले तरी ते ओवैसी, गद्दार, आतंकवाद आणि सर्वात शेवटी पाकिस्तानचे नाव घेतील. भाजपने खरंतर हे सांगावे की, तेलंगणा आणि खासकरुन हैदराबादला त्यांनी २०१९ नंतर कोणती आर्थिक मदत दिली.

उत्तर प्रदेश सरकारने कथित लव जिहात थांबविण्यासाठी कडक कायदा आणण्याची घोषणा केली आहे. तर मध्य प्रदेश सरकारनेही अशाचप्रकारचा कायदा आणण्याची तयारी केली आहे. नुकतेच अलाहाबाद हायकोर्टाने एक निर्णय दिला होता की, लग्नासाठी धर्म परिवर्तन करण्याची गरज नाही. उत्तर प्रदेशनंतर मध्य प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक राज्यानेही लव जिहादच्या विरोधात कायदा आणण्याची तयारी केली आहे.

उत्तर प्रदेशने तर या कायद्याचा मसुदा देखील तयार केला आहे. यामध्ये आमिष दाखवून लग्न केल्यास आणि धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकल्यास गुन्हा नोंदविण्याची तरतूद करण्यात आली आहे. सध्या विधी व न्याय विभाग या कायद्यावर चर्चा करत आहे. तर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी देखील पुढील अधिवेशनात लव जिहादविरोधी कायदा आणण्याची तयारी केली आहे. या कायद्यानुसार लव जिहाद आणि धर्मांतरणच्या विरोधात पीडित किंवा तिचे कुटुंबिय तक्रार दाखल करु शकतात. जर कुणाला स्वेच्छेने धर्म परिवर्तन करायचे असेल तर त्याला एक महिन्याआधी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागणार आहे.

लव जिहाद कायद्यानुसार बळजबरीने केलेले धर्मांतर केल्यास गुन्हा दाखल केला जाणार आहे. तसेच असे लग्न बाद करण्याची तरतूद कायद्यात करण्यात येणार आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर कोणत्याही वॉरंट शिवाय पोलीस आरोपीला अटक करु शकतात. दोषी आढळल्यास ५ वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा देण्यात येईल. तसेच या लग्नाला मदत करणाऱ्यांना देखील तेवढीच शिक्षा देण्यात येणार आहे.