अजब मागणी! ग्राहक सेवा प्रतिनिधी हिंदूच हवा

उत्तर प्रदेशच्या पुजा सिंह नावाच्या तरुणीने एअरटेलला ट्विट करुन आपल्या समस्येच्या निवारण्यासाठी हिंदूच कस्टमर केअर प्रतिनिधी असण्याची मागणी केली. यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पुजाला ट्रोल केले जात आहे.

Lucknow
twitter
प्रातिनिधिक फोटो

सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्ट कशा ट्रोल होतात, याचं आणखी एक ताजं उदाहरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेशच्या लखनऊमधील एका तरुणीने ट्विटरवर एक पोस्ट टाकल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली. या तरुणीने एअरटेलला टॅग करुन ट्विट केले. ‘एअरटेलने तिच्या घरी हिंदू कस्टमर केअर प्रतिनिधी पाठवावा’. या ट्विटनंतर सोशल मीडियावर ती चांगलीच ट्रोल होताना दिसत आहे. पुजाच्या घरी एअरटेल कंपनीचे डिजीटल टीव्ही कनेक्शन आहे. या कनेक्शनमध्ये काही समस्या उद्भवल्याने तीने त्यासंबंधी माहिती ट्विटरवर दिली. त्याचबरोबर या समस्येचे निवारण करण्यासाठी घरी येणारा प्रतिनिधी हा हिंदूच हवा, असा उल्लेख केला आहे.

लखनऊस्थित असलेल्या पुजा सिंहच्या घरी एअरटेल डिजिटल टीव्हीचे कनेक्शन आहे. या कनेक्शनशी संबंधित समस्येवर पुजाने ट्विटरमार्फत तक्रार केली. तिच्या या ट्विटला एअरटेलच्या शोएब नावाच्या मुस्लीम कर्मचाऱ्याने उत्तर दिले. मात्र पुजाला तिच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी हिंदू प्रतिनिधीच हवा होता.

तिने शोएबला उत्तर देताना ट्विट केले, ‘प्रिय शोएब, तू एक मुस्लीम आहे. माझा तुझ्या कामावर विश्वास नाही. कारण तुझ्या कुराणमध्ये कस्टमर सर्विसचे वेगळे प्रकार असू शकतील. मी तूला विनंती करते की, माझ्या समस्येचे निवारण करण्याची जबाबदारी एका हिंदू प्रतिनिधीला द्यावी’. यानंतर काही तासांनी एअरटेलच्या गगनजोत नावाच्या एका कार्यकारी कस्टमर केअर प्रतिनिधीने पुजाला ट्विट करुन तिच्या समस्येचे निवारण करण्याचे आश्वासन दिले.

सोशल मीडियामध्ये एअरटेलवर टीका

या सगळ्या प्रकारानंतर सोशल मीडियावर लोकांनी पुजाच्या कट्टरतेवर जोरदार टीका केली. त्याचबरोबर एअरटेल सारख्या एवढ्या मोठ्या कंपनीनेही तिच्या या हिंदू प्रतिनिधीच्या मागणीवर प्रश्न न उचलल्यामुळे लोकांनी एअरटेलवरही टीका करण्यास सुरुवात केली आहे. हे प्रकरण आणखी वाढत जाण्याअगोदर एअरटेलने ट्विट करुन सांगितले की, ‘एअरटेल कुठल्याही ग्राहकाशी जाती-धर्माच्या नावाने भेदभाव करीत नाही. तक्रारीचा कॉल आल्यावर जो प्रतिनिधी उपस्थित असतो, त्याला तात्काळ पाठविले जाते’.

ट्रोल झाल्यानंतर पुजाने स्वत:चे समर्थन केले

या सगळ्या घटने नंतर सोशल मीडियावर पुजाला फार मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले. यावर पुजाने ट्विट करुन सांगितले की, ‘मी मुस्लिम प्रतिनिधीच्या बदल्यात हिंदू प्रतिनिधी पाठवण्याची विनंती केली. कारण तो माझा हक्क आहे. मागच्या वेळी मला फार वाईट अनुभव आला होता. फक्त प्रतिनिधी बदलण्याच्या विनंतीवरुन मला एवढ्या शिव्या पडत आहेत. परंतु, यावरुन हे सिद्ध होते की, मी योग्यच आहे.’