उत्तर महाराष्ट्रात आघाडी विरुद्ध युती

नगरच्या लढतीकडे राज्याचे लक्ष, विद्यमान खासदारांना पुन्हा संधी

Mumbai
नंदुरबारमधून डॉ. हिना गावित

भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या यादीत उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि दिंडोरी मतदारसंघ वगळता इतर चार मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. उत्तर महाराष्ट्रातील आठ मतदारसंघांपैकी सहा मतदारसंघात भाजपचे खासदार आहेत. पक्षाने धुळे लोकसभा मतदारसंघातून संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना पुन्हा संधी दिली आहे, तर नंदुरबारमधून डॉ. हिना गावित, रावेरमधून रक्षा खडसे या विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नगर मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता कट करत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी दिली आहे. विखे आणि शरद पवार यांच्यातील वाकयुद्ध संपूर्ण राज्याने पाहिले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून, राज्यातील प्रतिष्ठेच्या लढतीत नगरमध्ये काट्याची लढत होणार, असे दिसते.

भाजपने नगरचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचे तिकीट कापत सुजय विखे यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे डॉ. सुजय विखे विरुद्ध संग्राम जगताप असा सामना थेट रंगणार आहे. पवार आणि विखे यांच्यातील वाकयुद्ध संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे या दोघांनीही नगर मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला आहे. त्यामुळे राज्यातील काट्याच्या लढतीत नगरचा समावेश असेल. राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप यांचे पुत्र संंग्राम विद्यमान आमदार आहेत.

धुळ्यात डॉ. भामरेंना करावी लागणार प्रयत्नांची पराकाष्टा
धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपने अपेक्षेप्रमाणे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर केली. १९९५ मध्ये राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी काँगे्रस, शिवसेनेनंतर भाजपमध्ये प्रवेश केला. २०१४ मध्ये मोदी लाटेत काँग्रेसचे आमदार आमरिश पटेल यांचा त्यांनी पराभव केला. पाकिस्तानच्या तावडीत सापडलेल्या चंदु चव्हाण या जवानाला मायदेशी सुखरूप आणणे आणि पुलवामा हल्ल्यानंतर झालेला एअर स्ट्राईक या बाबी संरक्षण राज्यमंत्री म्हणून डॉ. भामरे यांच्या प्रचारातील प्रमुख मुद्दे असणार आहेत. मतदारसंघात वर्चस्व कायम राखण्यासाठी त्यांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. डॉ. भामरें विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपमधील नाराज गट एकत्र आले आहेत. या मतदारसंघातून काँग्रेसने कुणाल पाटील या तरुण चेहर्‍याला संधी दिली आहे. डॉ. तुषार शेवाळे यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत, तर धुळ्यातून भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी भाजपविरुद्ध शडडू ठोकले आहे.

शिर्डीत विखेंची प्रतिष्ठा पणाला
राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विखे यांना कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी रणनीती आखल्याचे दिसून येते. याचाच एक भाग म्हणून धुळ्यातून विखे यांचे समर्थक श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा काँग्रेसच्या पहिल्याच यादीत सामावेश करून शिर्डीतून उमेदवारी जाहीर झाली. विखे यांचे दुसरे समर्थक करण ससाणे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली. शिर्डी मतदारसंघात विखेंच्या प्रतिष्ठेची कसोटी लागणार आहे. शिवसेनेने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

नंदुरबारमध्ये गावित विरुद्ध पाडवी
भाजपच्या विद्यमान खासदार डॉ. हिना गावित यांनाच पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. गावित यांनी या मतदारसंघात नऊ वेळा खासदार असलेल्या माणिकराव गावित यांचा पराभव केला होता. स्वातंत्र्यानंतर कधीही भाजपला न मिळालेल्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात गावित यांनी भाजपचे कमळ फुलवले. गावित यांचा सामना काँग्रेसच्या के.सी.पाडवी यांच्याशी असणार आहे. काँग्रेसच्या गावितानंतर कोण असा प्रश्न आला तेव्हा शर्यतीत असलेल्या तीन नावातून त्यांच्या नावाला काँग्रेसच्या वरिष्ठांकडून एकमताने पसंती देण्यात आली.

रावेरमधून रक्षा खडसे
मागील पंचवार्षिक निवडणूक अनेक कारणांनी गाजली होती. भाजपचे तत्कालीन खासदार हरिभाऊ जावळे यांचे तिकीट कापून ऐनवेळी रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली होती. राष्ट्रवादीच्या चर्चेत असलेल्या उमेदवारांना डावलून काँग्रसचे मनीष जैन यांनी आमदरकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. यंदाही रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आघाडीच्या जागावाटपानुसार जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. मात्र, दोन पंचवार्षिक ही जागा राष्ट्रवादीने लढवली. त्यांना अपयश आल्याने काँग्रेसने ही जागा मागितली आहे. त्यामुळे डॉ. उल्हास पाटील हे जोरदार तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादीने विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांना रिंगणात उतरवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here