घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCorona : पुढचे ३ महिने अमेरिकेसाठी सर्वात भीषण, ज्येष्ठ अमेरिकन विषाणूतज्ज्ञाचा इशारा!

Corona : पुढचे ३ महिने अमेरिकेसाठी सर्वात भीषण, ज्येष्ठ अमेरिकन विषाणूतज्ज्ञाचा इशारा!

Subscribe

गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून कोरोनानं जगभर थैमान घातलं आहे. अमेरिकेत सर्वाधिक कोरोनाचे (Corona) रुग्ण सापडले आहेत. आजघडीला दिवसाला अमेरिकेत सर्वाधिक रुग्ण सापडत असून मृत्यू देखील सर्वाधिक होत आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेत कोरोनानं आपलं रौद्ररूप दाखवल्याचं म्हटलं जात असतानाच अमेरिकेतल्याच ज्येष्ठ विषाणू तज्ज्ञानं अमेरिकी सरकारला एक गंभीर इशारा दिला आहे. कोरोनाच्या दृष्टीकोनातून अमेरिकेसाठी पुढचे ६ ते १२ आठवडे म्हणजेच किमान ३ महिने हे सर्वात भीषण असतील, असा इशारा अमेरिकेच्या मिनेसोटा विद्यापीठातल्या सेंटर फॉर इन्फेक्शियस डिसीज रिसर्च सेंटरचे ज्येष्ठ विषाणूतज्ज्ञ डॉ. मायकल ओस्टरहोम यांनी दिला आहे. त्यामुळे कोरोनामुळे आत्तापर्यंत झालं ते काहीच नाही, पुढे कोरोनाचं (Covid 19) अजून भीषण रूप पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.

काय म्हणाले मायकल ओस्टरहोम?

डॉ. मायकल ओस्टरहोम यांनी एनबीसीच्या मीट द प्रेस या कार्यक्रमात बोलताना अमेरिकन प्रशासनाला आणि संपूर्ण जगालाच हा इशारा दिला आहे. ‘पुढचे ३ महिने कोरोनाच्या दृष्टीने अमेरिकेसाठी सर्वात भीषण आणि सर्वाधिक नुकसान करणारे असतील. एकीकडे कोरोनाच्या लसीवर संशोधन जरी सुरू असलं आणि त्याच्याशी लढा देण्यासाठी आपली आरोग्य यंत्रणा सक्षम जरी असली, तरी कोरोनाचं रौद्ररूप या ३ महिन्यांत अमेरिकेला आणि पर्यायाने जगाला देखील पाहायला मिळणार आहे’, असं ओस्टरहोम म्हणाले.

- Advertisement -

जुलै २०२१शिवाय व्हॅक्सिन येणार नाही!

दरम्यान, यावेळी बोलताना ओस्टरहोम यांनी दुसरा इशारा दिला आहे. ‘कोरोना लसीवर (Corona Vaccine) अमेरिकेत संशोधन सुरू आहे. त्यात प्रगती देखील दिसत आहे. पण कितीही केलं, तरी पुढच्या वर्षी जुलैच्या आधी कोरोनाची लस योग्य पद्धतीने आणि सुरक्षितपणे वापरण्यासाठी उपलब्ध होणार नाही’, असं ते म्हणाले. त्यामुळे अमेरिकेसोबतच आख्ख्या जगासाठीही हा गंभीर इशारा मानला जात आहे.

कोरोनाचे संदेश पोहोचवण्यात खरी समस्या!

अमेरिकेत कोरोना गंभीर पातळीवर पोहोचण्यासाठी जनजागृतीत सरकारला येणारं अपयश कारणीभूत ठरल्याचं ते म्हणाले. आजघडीला अमेरिकेतली किमान ५० टक्के जनता ही कोरोना लसीबद्दल भिती बाळगून आहे, असं त्यांनी सांगितलं. अमेरिकेत दिवसाला सरासरी ६५ ते ७० हजार कोरोनाचे नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे अमेरिकन सरकारला अधिक सक्षमपणे लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे असं त्यांनी नमूद केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -