मराठा आरक्षणासाठी अमित शहांनी बोलावली तातडीची बैठक

सध्या मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण पेटलेले असताना आता दिल्लीतही त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक बोलावली असून यामध्ये मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

Mumbai
maratha morcha
मराठा क्रांती मोर्चा आंदोलन

सध्या मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण पेटलेले असताना आता महाराष्ट्र निघणाऱ्या या ठोक मोर्चाची दखल दिल्लीत देखील घेतल्याचे पहायला मिळत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह राज्यातील मराठा खासदारांची तातडीची बैठक बोलवल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीत राज्य प्रभारी सरोज पांडेदेखील उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, यावेळी मराठा आरक्षणासोबत धनगर आणि मुस्लिम आरक्षणाबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.

कायदेशीर प्रक्रिया नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणार

राज्य मागास आयोग स्वायत्त आहे. त्यामुळे सरकार कोणताही दबाव टाकू शकत नाही. मात्र मराठा आरक्षणाबाबतची कायदेशीर प्रक्रिया ही नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगितले होते. तसेच आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगा भरतीला स्थगिती देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले होते. याच बरोबर मराठा आरक्षणासोबत धनगर समाजाच्या आरक्षणावर देखील राज्य सरकारने टीआयएसएसला अभ्यास करण्यास सांगितले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जंतरमंतरवर मराठ्यांचे आंदोलन

दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणासाठी विविध ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाची आंदोलन सुरु असताना आणि फडणवीस सरकार समाजाच्या मागण्या मान्य करत नाही, या कारणास्तव आता मराठा क्रांती मोर्चाने दिल्लीकडे कूच केली आहे. जंतरमंतरवर अनेक मराठा संघटना महाराष्ट्रातून दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत.