निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला २६८ कोटींची मदत जाहीर

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरीमध्ये नुकसान

कोरोनाचे संकट असतानाच यावर्षी भारतातील काही राज्यांमध्ये अतिवृष्टी, पूर आणि चक्रीवादळाने थैमान घातल्याचे पाहायला मिळाले. आधीच कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला खिळ बसल्यामुळे या नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी केंद्राने मदत करावी, अशी मागणी करण्यात येत होती. या मागणीला आता यश आले असून केंद्र सरकारने सहा राज्यांना नुकसानातून सावरण्यासाठी ४ हजार ३८१ कोटी रुपयांची आर्थिक मदतीचे पॅकेज घोषित केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वातील  समितीेने सहा राज्यांसाठी हे पॅकेज जाहीर केले. मात्र महाराष्ट्रातील निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानासाठी २६८.५९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे महाराष्ट्राने निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानभरपाईसाठी १ हजार ६५ कोटी रुपयांची मागणी  केली होती. मात्र इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला अतिशय तुटपुंजी रक्कम मिळाली आहे. महाराष्ट्रासोबत मदत मिळालेले इतर राज्य पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि सिक्कीम असे आहेत.

पश्चिम बंगालच्या अंफान वादळासाठी सर्वाधिक मदत

पश्चिम बंगालला अंफान वादळाने धडक दिली होती. अंफानसाठी सर्वाधिक २७०७.७७ कोटींची मदत करण्यात आली आहे. एकूण ४३८२ कोटींपैकी जवळपास अर्ध्याहून अधिक मदत ही अंफान वादळासाठी बंगालला देण्यात आली आहे. तसेच यापूर्वी १ हजार कोटी रुपयांची मदत करण्यात आली होती.

महाराष्ट्र : २६८ कोटी ५९ लाख

पश्चिम बंगाल: २७०७.७७ कोटी

कर्नाटक : ५७७.८४ कोटी

मध्य प्रदेश : ६११.६४ कोटी

सिक्कीम : ८७.८४ कोटी

ओडिशा : १२८.२३ कोटी