घरदेश-विदेशअनिल अंबानींचा काँग्रेसवरचा ५ हजार कोटींचा दावा मागे; तर्क-वितर्कांना सुरुवात!

अनिल अंबानींचा काँग्रेसवरचा ५ हजार कोटींचा दावा मागे; तर्क-वितर्कांना सुरुवात!

Subscribe

अनिल अंबानींवर राफेल प्रकरणी आरोप करणाऱ्या काँग्रेसवर रिलायन्स उद्योग समूहाने तब्बल ५ हजार कोटींचा मानहानीचा दावा ठोकला होता. मात्र, मंगळवारी अचानक हा दावा रिलायन्सने मागे घेतला आहे. त्यामुळे या प्रकारावर तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

काँग्रेसकडून गेल्या अनेक दिवसांपासून राफेलच्या प्रश्नावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर वारंवार टीका केली जात होती. या टीकेच्या विरोधात उद्योगपती अनिल अंबानी यांनी न्यायालयाचे दार ठोठावत काँग्रेस आणि नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्राविरोधात मानहानीचा दावा ठोकला होता. सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा हा मानहानीचा दावा अंबानींकडून ठोकण्यात आला होता. मात्र मंगळवारी अचानकपणे या प्रकरणातील खटले मागे घेत असल्याचे अंबानी यांचे वकील राकेश पारीख यांनी कोर्टात जाहीर केले. त्यामुळे आता याप्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. तसेच, अचानक अनिल अंबानी यांनी खटले मागे का घेतले? अशी शंका देखील उपस्थित केली जात आहे. विशेषत: ‘चौकीदीर चौर है’ या राहुल गांधींच्या मोहिमेमध्ये आरोपांच्या केंद्रस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती अनिल अंबानी होते. त्यामुळे त्यांनी ठोकलेल्या ५००० कोटींच्या मानहानीच्या दाव्याकडे सगळ्यांचच लक्ष लागलं होतं.

याचिकेत ६ काँग्रेस नेत्यांचा समावेश

राफेल कराराच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राविरोधात उद्योगपती अनिल अंबानी यांनी अहमदाबाद येथील न्यायालयात नॅशनल हेरॉल्डमध्ये आलेल्या राफेल कराराबाबतच्या लेखाविरोधात हा दावा दाखल केला होता. नॅशनल हेरॉल्डमध्ये राफेल कराराबाबत खोटी आणि अपमान करणारी माहिती छापल्याप्रकरणी अनिल अंबानी यांनी हा दावा दाखल केला होता. या खटल्यावर सत्र न्यायाधीश पी. जे. तमकुवाला यांच्या कोर्टात कामकाजही सुरु होते. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स कंपनीने काँग्रेस नेते सुनील जाखड, रणदीपसिंह सुरजेवाला, ओमन चांडी, अशोक चव्हाण, अभिषेक मनु सिंघवी आणि संजय निरूपम या नेत्यांविरोधात, तसेच नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. काही पत्रकारांचाही यामध्ये समावेश होता.

- Advertisement -

हेही वाचा – ‘हा घ्या पुरावा; मोदींनी ३० हजार कोटी चोरून अनिल अंबानींना दिले’

नॅशनल हेरॉल्डमधील ‘त्या’ वृत्ताचं काय झालं?

नॅशनल हेरॉल्डमध्ये ‘अनिल अंबानी यांनी मोदींकडून राफेल कराराची घोषणा होण्याच्या दहा दिवस आधी रिलायन्स डिफेन्स ही कंपनी बनवली’ या आशयाचा लेख छापण्यात आला होता. मात्र, यासंदर्भातला खटला मागे घेण्यात येत आहे, अशी माहिती अंबानी यांच्या वकिलांनी कोर्टात दिली. दरम्यान, ‘मानहानीचा खटला मागे घेण्याबाबतच्या सूचना मिळाल्या असून कोर्टाच्या सुट्ट्या संपल्यानंतर हा खटला मागे घेण्याची औपचारिक प्रक्रिया पूर्ण केली जाईल’, असे नॅशनल हेरॉल्ड आणि काँग्रेस नेत्यांचे वकील पी. एस. चंपानेरी यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -