Corona: देशात रूग्णांवर घोड्यांच्या रक्तातील अँटीबॉडीचा वापर होणार? DCGI ची मंजुरी

घोड्यांच्या शरीरात कोरोना विषाणू विरोधात लढण्यासाठी अँटीबॉडीजची निर्मिती झाल्याचे दिसून आले.

जगभरात कोरोनाचा फैलाव सुरू असून दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढता आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अद्याप अनेक देश प्रयत्नशील आहे. कोरोना व्हायरसपासून मानवी जीवन वाचवण्यासाठी उपचाराचे वेगवेगळे मार्ग शोधले जात आहेत. लसीच्या बरोबरीनेच वेगवेगळया नव्या उपचार पद्धती विकसित केल्या जात आहेत. भारतातही आयसीएमआर लवकरच नव्या उपचार पद्धतीसाठी मानवी चाचणी सुरु करणार असल्याचे सांगितले जात आहे. कोरोना व्हायरसवर उपचारासाठी इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) ‘अँटीसेरा’ विकसित केल्या आहेत.

प्लाझ्मा थेरपी सारखीच ही थेरपी

अँटीसेराच्या क्लिनिकल चाचण्यांना ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) मंजुरी दिली आहे. प्राण्यांमध्ये SARS-CoV-2 विषाणू सोडून या अँटीसेराची निर्मिती करण्यात आली आहे. आयसीएमआर आणि हैदराबाद स्थित बायोफार्मा कंपनी बायोलॉजिकल इ लिमिटेडने मिळून अँटीसेरा विकसित केले आहेत. अँटीसेरा हा अँटीबॉडी उपचारांचा एक भाग आहे. घोड्यांमध्ये निष्क्रिय कोविड-१९ विषाणू सोडून या अँटीसेराची निर्मिती करण्यात आली आहे. प्लाझ्मा थेरपी सारखीच ही थेरपी आहे. या प्रकरणात घोड्यांच्या शरीरातून ब्लड प्लाझ्मा घेण्यात येतात.

घोड्यांच्या अँटीबॉडीजचा मानवी उपचारांमध्ये वापर

SARS-CoV-2 ची लागण झाल्यानंतर त्यातून बऱ्या झालेल्या घोड्यांच्या शरीरात अँटीबॉडीज आढळल्या. याच अँटीबॉडीजचा मानवी उपचारांमध्ये वापर करण्यात येणार आहे. घोड्यांमधील अँटीबॉडीजना अँटीसेरा म्हटले जाते. आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिलेल्या माहितीनुसार, “बायोलॉजिकल इ सोबत मिळून आम्ही घोड्यांमधील अँटीसेराची निर्मिती केली आहे. याच्या क्लिनिकल चाचण्यांसाठी आम्हाला परवानगी मिळाली आहे” दरम्यान, अँटीसेरामुळे विशिष्ट संसर्गाविरोधात लढण्यासाठी मानवी शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीला चालना मिळते. तसेच सुरक्षितता आणि परिणामकारकता समजण्यासाठी अँटीसेराची मानवी चाचणी अद्याप सुरु झालेली नाही, अशी माहिती मिळतेय.

घोड्यांच्या शरीरात विषाणू विरोधात अँटीबॉडीजची निर्मिती

मिळालेल्या माहितीनुसार, अभ्यासाचा भाग म्हणून १० तंदुरुस्त घोड्यांमध्ये निष्क्रिय SARS-CoV-2 विषाणू सोडण्यात आला. त्यानंतर २१ दिवसांनी घोड्यांच्या शरीरातील प्लाझ्मा नमुन्याची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये घोड्यांच्या शरीरात विषाणू विरोधात लढण्यासाठी अँटीबॉडीजची निर्मिती झाल्याचे दिसून आले.

देशात दिवसभरात ७२,०४९ नवे कोरोनाबाधित

देशात गेल्या २४ तासांत ७२ हजार ४९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ९८६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ६७ लाख ५७ हजार १३२वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४ हजार ५५५ रुग्णांचा मृत्यू झाला असून ५७ लाख ४४ हजार ६९४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ९ लाख ७ हजार ८८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


Corona: राज्यातील कोरोनाग्रस्तांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक