भारतीय सीमेत आलेला एकही अतिरेकी जिवंत वाचणार नाही; लष्करप्रमुख नरवणेंचा इशारा

लष्करप्रमुख मनोज नरवणे

जम्मू-काश्मीरमधील नगरोटा येथे गुरुवारी (दि. १९ नोव्हेंबर) सकाळी सुरक्षा दलाने जैश-ए-मोहम्मदच्या ४ अतिरेक्यांचा खात्मा केला. त्यानंतर भारतीय लष्कर प्रमुख एम.एम. नरवणे यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतात आलेला एकही अतिरेकी जिवंत राहणार नसल्याचा इशारा दिला. भारतात घुसखोरी करणाऱ्या अतिरेकी आणि पाकिस्तानला आम्ही स्पष्ट संदेश देऊ इच्छितो की, जो कुणी भारतात घुसखोरी करेल त्याला नगरोटा प्रमाणेच हाताळले जाईल. त्यानंतर ते अतिरेकी जिवंत परतू शकणार नाहीत.

सुरक्षा दलाने एका तांदळाच्या पोत्यांनी भरलेल्या ट्रकमधून चोरून घुसखोरी करणाऱ्या चार अतिरेक्यांना कंठस्नान घातले. या अतिरेक्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आढळून आला होता. त्यावरुन ते काहीतरी मोठा घातपात करण्याच्या दृष्टीने आले असावेत, असा अंदाज बांधण्यात येत आहे. या कारवाईनंतर लष्करप्रमुख नरवणे यांनी सुरक्षा दलाचे कौतुक केले. तसेच भविष्यात घुसखोरी करणाऱ्या अतिरेक्यांना अशाच प्रकारे संपवले जाईल, असेही सांगितले.

जम्मू-कश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात आज सकाळी अतिरेकी आणि सुरक्षा दलात चकमक उडाली. यावेळी पोलीस दलाचा एक शिपाई जखमी झाला तर चार अतिरेक्यांना मारण्यात सुरक्षा दलाला यश आले.