अरुण जेटलींची प्रकृती स्थिर; उपराष्ट्रपती वेंकय्या नायडूंनी घेतली भेट

वेंकय्या नायडू यांनी अरुण जेटली यांच्या कुटुंबीयांची देखील घेतली भेट

Mumbai
ajun jetaily
अर्थमंत्री अरुण जेटली

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना होत असलेल्या श्वसनाच्या त्रासामुळे शुक्रवारी एम्स रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. तसेच, गेल्या काही महिन्यांपासून अरुण जेटली कर्करोगाने त्रस्त होते. त्यांना मांडीतील पेशींचा कॅन्सर झाला होता. कॅन्सरचे निदान झाल्यानंतर ते उपचारासाठी न्यूयॉर्कला देखील जाऊन आले होते. तिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणयात आली होती. ६६ वर्षांचे अरुण जेटली किडनीच्या आजाराने देखील त्रस्त होते. गेल्या वर्षी १४ मे रोजी त्यांची एम्स रूग्णालयामध्ये किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती.

मात्र, आता अरुण जेटली यांची प्रकृती स्थिर असून, ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी शनिवारी सकाळी एम्समध्ये जाऊन अरुण जेटली यांच्या तब्ब्येतीची चौकशी केली.

यावेळी वेंकय्या नायडू यांनी तिथे अरुण जेटली यांच्या कुटुंबीयांची भेट देखील घेतली. तेथे असणाऱ्या डॉक्टरांनी उपराष्ट्रपतींना सांगितले की,जेटली यांची प्रकृती आता स्थिर आहे आणि ते औषधोपचारांना योग्य प्रतिसादही देत आहेत. त्यांचा रक्तपुरवठा व्यवस्थित असून, हृदयाचे कार्यही व्यवस्थित कार्य करीत आहे.