तुतीकोरीन हिंसाचारात १३ मृत्यू, तीन जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद

TamilNadu Protest
तुतीकोरीन हिंसाचार

स्टरलाइट कॉपर प्लांटच्या विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून शंभरहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. याप्रकरणी आत्तापर्यंत ६७ लोकांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेसंदर्भात इंटरनेटवरून अफवा पसरवल्या जात असल्याने ५ दिवसांसाठी येथील थुथुकुडी, तिरुनेलवेली आणि कन्याकुमारी या तीन जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे.
सध्या येथे कलम १४४ लागू करण्यात आला आहे. (कलम १४४ संचारबंदी – चारहून अधिक लोक जमल्यास त्यांना अटक करण्याचे आदेश). तमिळनाडू सरकारने मद्रास हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनवून या हिंसाचाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

हिंसाचाराचे मुख्य कारण
तुतीकोरीन येथील स्टरलाईट कॉपर युनिट प्लांटला स्थानिक नागरिकांचा मोठा विरोध आहे. शंभर दिवसांच्या आंदोलनानंतर आता या आंदोलनाला हिंसक वळण लागले. या प्लांटमुळे येथील परिसरात प्रदूषण वाढले असल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती. कॉपर युनिटमुळे हवा आणि पाणी या दोघांमध्ये प्रदूषण होत आहे. तसेच यामुळे त्वचेवरही परिणाम होऊन श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. हिंसाचाराच्या मुद्यावरुन तेथील सरकारवर विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर टीका केली. दरम्यान, हिंसाचारानंतर विरोधी पक्ष डीएमकेचे नेते एम.के. स्टालिन यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली.

स्टरलाईट कॉपर युनिटचं स्पष्टीकरण
दरम्यान, या घटनेनंतर प्लांटमधील काम बंद केल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत कंपनीचे कामकाज बंद राहणार आहे. २७ मार्च पासूनच हे काम बंद असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर तमिळनाडूमध्ये नव्याने उभारल्या जाणाऱ्या कंपन्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत.

आरएसएस विरोधात राहुल गांधींची टीका
या वादाला आता राजकीय वळण लागले असून काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधींनीही यावर टीका केली आहे. त्यांनी आरएसएसवर निशाणा साधताना ‘आरएसएसच्या विचारांना न मानणाऱ्या लोकांची हत्या केली जात आहे’, असे ट्वीट केले आहे.