आसाम: भाजप यशाची मालिका कायम ठेवणार?

Mumbai
आसाम

आसाम हे ईशान्यकडील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. या राज्यात लोकसभेच्या १४ जागा असून येथे तीन टप्प्यात लोकसभेसाठी मतदान होणार आहे. ११ आणि १८ एप्रिल रोजी प्रत्येकी पाच मतदार संघात मतदान होणार आहे. तर उरलेल्या चार मतदार संघात २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आसाममध्ये विधान सभेत २०१६ साली भाजप सत्तेत आली. तेथून भाजपच्या ईशान्य भारतातील प्रवेश सुरू झाला. भाजपने आसाममध्ये विकास केला हे कोणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत या राज्यात मोठे यश मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

मात्र नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला येथील स्थानिक जनतेचा विरोध आहे. त्याचा प्रभाव लोकसभा निवडणुकीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच नागरिक नोंदणी मोहिमेमुळेही येथील जनतेत असंतोष निर्माण झाला आहे. या राज्यात काँग्रेसविरुद्ध भाजप अशी थेट लढत होणार आहे. आसाममध्ये १० मतदार संघात मुस्लिम मते महत्त्वाची मानली जातात.

मतदार संघ
१- करिम गंज, २ -शिलचर, ३ – स्वायत्त जिल्हा, ४ -धुबरी, ५ -कोकराझार, ६ -बारपेट, ७ -गोहाटी, ८ -मांगलडोई, ९ -तेजपूर, १०-नागांव, ११ – कालियाबोर, १२ -जोरहाट, १३ -दिबुर्गगढ, १४ -लखिमपूर

२०१४ सालचे बलाबल
२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत आसाममध्ये भाजपने १४ पैकी ७ जागा जिंकल्या होत्या. एआययुडीएफ या आघाडीला ३ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसलाही ३ आणि १ जागा अपक्ष उमेदवाराला मिळाली होती.

आसाममधील मतदार
आसाम हे ईशान्य भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. त्यामुळे येथील मतदारांची संख्या जास्त आहे. आसाममध्ये लोकसभेसाठी एकूण २ कोटी १७ लाख, ६० हजार ६०४ मतदार आहेत. त्यापैकी १ कोटी ११ लाख ३२ हजार, ७८२ मतदार पुरुष आहेत. तर १ कोटी ०६ लाख २७ हजार ३१९ मतदार या महिला आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here