या पुढे एटीएम शुल्क लागणार नाही?

एटीएमशुल्क संपुष्टात आणण्यासाठी रिझर्व बँकेकडून समिती

Mumbai
sbi atm
एसबीआय एटीएम

एनईएफटी आणि आरटीजीएसवरील शुल्क संपुष्टात आणल्यानंतर आता रिझर्व बँक लवकरच ग्राहकांच्या हितासाठी आणखी एक उपयुक्त निर्णय घेण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे एटीएम (ऑटोमेटेड टेलर मशीन) च्या वापरासाठी आकारले जाणारे शुल्क येथून पुढे देण्याची आवश्यकता लागणार नाही. त्यामुळे बँक ग्राहकांना मोठा दिलासा मिळू शकतो. सध्या एटीएमच्या वापरावर शुल्क द्यावे लागते.

यासंदर्भात समीक्षा करण्यासाठी रिझर्व बँकेने एक समिती गठीत केली असून दोन महिन्यांच्या आत ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर रिझर्व बँक यासंदर्भात मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या महिन्यात जारी केलेल्या द्वैमासिक अर्थधोरणातही याबद्दलचा उल्लेख रिझर्व बँकेने केला होता. याचा मुख्य उद्देश एटीएम सुविधेपासून अजूनही वंचित असलेल्या ग्राहकांना एटीएम वापरासाठी उद्युक्त करणे हा आहे.

इंडियन बँक असोसिएशनच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार असून एटीएम फी आणि एटीएम चार्जेस यांच्याबद्दलची समीक्षाही करणार असल्याचे रिझर्व बँकेने म्हटले आहे. विकास आणि नियमन धोरण जारी करताना बँकेने ही माहिती दिली आहे.