थंडीत चिंता वाढणार; Coronavirus २० डिग्री तापमानात मोबाईलवर २८ दिवस जिवंत राहतो

coronavirus survives on mobile
प्रातिनिधिक छायाचित्र

संपुर्ण जग अजूनही कोरोना व्हायरसविरोधात लढत असताना दिवसेंदिवस नवे संशोधन समोर येत आहेत. जगभरात कोरोना व्हायरसमुळे ३.७१ कोटी लोक संक्रमित झालेले आहेत. तर १० लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे. भारतात देखील ७० लाख कोरोना रुग्ण आढळले आहेत. आता ऑस्ट्रेलियातील तज्ज्ञांनी केलेल्या एका नव्या संशोधनानुसार २० डिग्री सेल्सियस तापमानात कोरोना विषाणू नोटा, ग्लास आणि स्टिलवर २८ दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो. या यादीत मोबाईलचा देखील समावेश आहे. संशोधनकर्त्यांनी असे सांगितले की, कोरोनाचा विषाणू इतर फ्लूच्या विषाणूपेक्षा जास्त वेळेपर्यंत जिवंत राहतो. त्यामुळे लोकांनी सतत हात धुणे आणि घरामध्ये साफसफाई ठेवणे हाच पर्याय आहे.

Virology जर्नलमध्ये प्रकाशित या संशोधनात ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय विज्ञान संस्थेने CSIRO च्या शोधकर्त्यांसह एक संशोधन केले. ज्यामध्ये २० डिग्री सेल्सियस तापमानात SARS-COV-2 हा व्हायरस २८ दिवसांपर्यंत प्लास्टिक, बँकेतील नोटा आणि मोबाईल स्क्रिनवर जिवंत राहत असल्याचे आढळले. याची तुलना Influenza A या विषाणूशी केल्यास हा व्हायरस १७ दिवसांपर्यंत जिवंत राहतो. याचा अर्थ कोरोनाचा विषाणू इतर विषाणूंपेक्षा किमान १० दिवसा जास्त जिवंत राहतो.

coronavirus survives on mobile 1

यापुर्वी WHO ने माहिती देताना सांगितले होते की, कोरोनाचा विषाणू कोणत्याही पृष्ठभागावर फार फार तर काही तास ते दोन-तीन दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो. मात्र आता ऑस्ट्रेलियातील संशोधनातून आलेल्या नव्या शोधामुळे जगाची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. थोड्याच दिवसांत भारतात थंडीची लाट पसरेल. सध्या ऑक्टोबर हिटमुळे पारा वाढलेला आहे. मात्र लवकरच नोव्हेंबरमध्ये थंडीची चाहुल लागायला सुरुवात होईल. या दिवसांत महाराष्ट्र आणि देशाच्या अनेक राज्यांमध्ये तापमान बरेच खाली येते.

दिलासादायक बाब म्हणजे, ऑस्ट्रेलियाच्या संशोधनकर्त्यांनी २०, ३० आणि ४० डिग्री सेल्सियसच्या तापमानात आपले संशोधन केले. याच्यात आढळून आले की, जसे जसे तापमान वाढत जाते, तसे कोरोनाच्या विषाणूला टिकाव धरणे अवघड जाते.