घरदेश-विदेश'डिसेंबरमध्ये अयोध्येत राम मंदिराचं बांधकाम सुरू होणार!'

‘डिसेंबरमध्ये अयोध्येत राम मंदिराचं बांधकाम सुरू होणार!’

Subscribe

अयोध्येमधल्या वादग्रस्त जमिनीवरून सध्या चर्चा सुरू असताना डिसेंबरमध्ये राम मंदिराचं बांधकाम सुरू होणार असं सांगत राम जन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष राम विलास वेदांती यांनी या प्रकरणात नवा धुरळा उडवून दिला आहे.

अयोध्येमध्ये राम मंदिर उभारलं जाणार की नाही? या मुद्द्याभोवती सध्या देशात सुरू असलेल्या ५ राज्यांमधल्या निवडणुका आणि पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांचं राजकारण फिरू लागलं आहे. महाराष्ट्रात पुढील वर्षीच होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्येही राम मंदिराचा मुद्दा गाजणार याची झलक उद्धव ठाकरेंनी २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार या दसरा मेळाव्यात केलेल्या घोषणेमुळे दिसली. मात्र आता अयोध्येतील राम जन्मभूमी न्यासानेच आक्रमक भूमिका घेत हा प्रश्न निकाली काढण्याची तयारी सुरू केल्याचं दिसून येत आहे. ‘कोणत्याही अध्यादेश किंवा कायद्याशिवाय अयोध्येमध्ये राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली जाईल’, असं वक्तव्य करून राम जन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष राम विलास वेदांती यांनी खळबळ उडवून दिली आहे.

- Advertisement -

मंदिर बांधकामाचा मुहूर्तही केला जाहीर!

‘मंदिर वहीं बनायेंगे, लेकिन तारीख नहीं बतायेंगे’, अशा टीकेला कंटाळूनच कदाचित अखेर राम जन्मभूमी न्यासाने स्वत:हूनच मंदिर बांधकामाचा मुहूर्त जाहीर करून टाकला आहे. ‘येत्या डिसेंबरमध्ये अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला सुरूवात होईल’, अशी घोषणाच न्यासाचे अध्यक्ष राम विलास वेदांती यांनी केली आहे. विशेष म्हणजे, जानेवारी महिन्यामध्ये राम मंदिरासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून त्याआधीच मंदिर बांधणीची घोषणा न्यासाकडून करण्यात आली आहे.

रामाचं नाही तर कुणाचं मंदिर बांधणार? – रामदेव बाबा

दरम्यान, आता अयोध्या प्रश्नात रामदेव बाबांनीही उडी घेतली आहे. अयोध्येत रामाचं मंदिर नाही बांधणार तर कुणाचं बांधणार? असं वक्तव्य करत बाबा रामदेव यांनीही या वादात उडी घेतली आहे. विशेष म्हणजे, याच वर्षी शुभ समाचार ऐकायला मिळेल, असे सूचक संकेतही त्यांनी यावेळी बोलताना दिले आहेत.

न्यासाला अध्यादेशाचीही गरज नाही!

दरम्यान, अयोध्येच्या वादग्रस्त जमिनीवर मंदीर उभारणीसाठी राम जन्मभूमी न्यासाने कोणत्याही अध्यादेशाची आवश्यकता नसल्याचं त्यांच्या घोषणेतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ‘कोणत्याही अध्यादेशाशिवाय परस्पर सामंजस्यातून अयोध्येत राम मंदिराचं बांधकाम आणि उभारणी होईल’, असं वक्तव्य वेदांती यांनी केलं आहे. मात्र, हे परस्पर सामंजस्य कसं साध्य होणार? न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीचं काय होणार? याविषयी मात्र त्यांनी काहीही भाष्य केलेलं नाही. तसेच, हे सामंजस्य नक्की कोणामध्ये होणार? यावरही ते काहीही बोललेले नाहीत.

- Advertisement -

लखनौमध्ये बांधणार मशीद

एकीकडे राम मंदिर अयोध्येमध्ये उभारण्याचे जाहीर करत असतानाच वेदांती यांनी मशीद उभारणीची जागाही जाहीर केली आहे. ‘राम मंदीर अयोध्येत उभारले जात असताना लखनौमध्ये मशीद उभारली जाईल’, असं त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. आता राम विलास वेदांती हे सगळं कसं जुळवून आणणार याविषयी त्यांच्याकडे सध्या तरी नक्की कोणताही प्लॅन असल्याचं दिसत नसलं, तरी त्यांच्या या वक्तव्यामुळे अयोध्या मुद्द्यावर नवी चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.


तुम्ही हे वाचलंत का? – ‘राम मंदिर नाही तर वोट नाही’ प्रविण तोगडिया यांचा इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -