आता मिळून-मिसळून राहायचं आहे – मोहन भागवत

सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणाचा निकाल दिल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी या निकालाचं स्वागत केलं आहे.

New Delhi
Mohan Bhagwat
मोहन भागवत

अयोध्या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निकालानंतर देशभरातून अनेक मान्यवरांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या निकालाचं स्वागत केलं असतानाच दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी निकालानंतर सगळ्यांनी मिळून मिसळून राहायला हवं असं आवाहन केलं आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर मोहन भागवतांनी दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये संघाची भूमिका स्पष्ट केली.

न्याय देणाऱ्या निर्णयाचं संघ स्वागत करतो. अनेक दशकांपासून सुरू असलेल्या प्रक्रियेनंतर हा निर्णय आला आहे. या प्रक्रियेमध्ये राम जन्मभूमीशी संबंधित सर्वच बाजूंचा बारकाईने विचार झाला आहे. या प्रक्रियेनंतर सर्वच न्यायमूर्ती आणि पक्षकारांचे आम्ही धन्यवाद मानतो. सगळ्या देशवासियांना विनंती आहे की कायद्याच्या चौकटीत राहूनच शांतपणे आणि संयमाने आपला आनंद व्यक्त करावा. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सरकार लवकरात लवकर अंमलबजावणी करेल, असा आम्हाला विश्वास आहे, असं मोहन भागवत यावेळी म्हणाले. दरम्यान, ‘सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आता आलेला आहे. आता आपल्या सगळ्यांना मिळून मिसळून रहायचं आहे. हिंदू असो वा मुस्लीम, सगळेच भारताचे नागरिक आहेत’, असं आवाहन यावेळी मोहन भागवत यांनी केलं.

‘देर आये, दुरुस्त आये’

‘दोन्ही पक्षकारांमध्ये सामोपचाराने मिटवण्याचे प्रयत्न झाले असतील. पण ते अयशस्वी झाले म्हणून न्यायालयात प्रकरण गेलं. निकाल लागण्यासाठी इतका उशीर झाला. पण हरकत नाही. देर आये, दुरुस्त आये’, असं देखील मोहन भागवतांनी यावेळी सांगितलं. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका मशिदीला अयोध्येमध्ये जमीन न देण्याची होती. पण जर सर्वोच्च न्यायालयाने सरकारला जमीन देण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत, तर त्यानुसार सरकार ठरवेल काय करायचं ते. एकाच ठिकाणी दोन्ही गटांची जेव्हा पूजा होते, तेव्हा समस्या निर्माण होते. म्हणून आम्ही ती भूमिका मांडली होती’, असं भागवतांनी यावेळी स्पष्ट केलं.


हेही वाचा – आज बाळासाहेब हवे होते-राज ठाकरे