Ayodhya verdict: राजकीय नेत्यांकडून अयोध्या निकालाचे स्वागत

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिला ऐतिहासिक निकाल

Mumbai
सौ. लोकसत्ता

संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या अयोध्या खटल्यावर आज सर्वोच्च न्यायालय आज शनिवारी, निकाल दिला असून सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठ आज निकाल जाहीर केला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यात यावे तर मशीद बांधण्यासाठी वेगळी ५ एकर जमीन देण्यात येणार आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिला. या निकालाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. यामध्ये अनेक राजकीय क्षेत्रातील मंडळीने रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादाचे स्वागत करत ट्विट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्या निकालानंतर केले पहिले ट्विट…

“देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणावर आपला निर्णय सांगितला असून या निर्णयाला कोणाचाही विजय-पराजय समजले जाऊ नये. रामभक्ती किंवा रहीमभक्ती, ही वेळ आपली भारतभक्ती अधिक बळकट करण्याचा आहे. देशातील नागरिकांनी शांतता, सद्भावना आणि एकता कायम राखावी”, असे ट्विटमध्ये सांगत मोदींनी समस्त जनतेला अहवान केले आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करत ‘सर्वोच्च न्यायालयाचा जो काही निकाल असेल तो आम्हाला मान्य असेल आणि सर्वांनी मान्य करावा अशी आमची सुरुवातीपासूनच भूमिका राहिली आहे. देशात धर्माच्या नावावरून आणखी कोणता नवीन वाद निर्माण होणार नाही अशी आशा आहे.’, असे म्हटले आहे.

‘कित्येक दशकांपासून सुरू असलेला  श्री रामजन्मभूमीचा कायदेशीर वाद आजच्या निकालानंतर संपला आहे. मी भारतीय न्यायव्यवस्था आणि सर्व न्यायाधीशांचे अभिनंदन करतो.’, असे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ट्विट करत निकालानंतर स्वागत केले.

‘अयोध्येच्या वादग्रस्त निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने आज आपला अंतिम निर्णय जाहीर केला आहे. मी आणि आमचा पक्ष या निर्णयाचा आदर करतो. अशी अपेक्षा आहे की सर्व राजकीय पक्ष आणि धार्मिक संघटना या निर्णयाचा आदर करतील.’,असे ट्विट करत या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या निर्णयाचे स्वागत केले आहे.

‘सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल महत्त्वपूर्ण आहे. या निकालामुळे मला खूप आनंद झाला आहे. आता लवकरात लवकर राम मंदिर देखील बांधलं जावं. पण यावेळी फक्त एकच वाटतं, यावेळी बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते’, अशी प्रतिक्रिया अयोध्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत दिली.

दरम्यान, अयोध्येतील वादग्रस्त २.७७ एकर जागा रामलल्लाची असल्याचा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. या निकालाकडे संपूर्ण देशांचं लक्ष लागलं होते. निकालाच्या पार्श्वभूमीवर देशात ठिकठिकाणी या आधीच सुरक्षेची संपूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. रामजन्मभूमी मंदिरासाठी ट्रस्ट स्थापन करण्याचा तसेच मुस्लीम वक्फ बोर्डाला मशिदीच्या उभारणासाठी पाच एकरांची पर्यायी जागा देण्याचा निकाल न्यायालयानं दिला आहे.