घरदेश-विदेशबांग्लादेशमध्ये २२ मजल्याच्या टॉवरला आग; २५ जणांचा मृत्यू

बांग्लादेशमध्ये २२ मजल्याच्या टॉवरला आग; २५ जणांचा मृत्यू

Subscribe

आग लागल्यामुळे ७ जणांनी घाबरुन बिल्डिंगवरुन उड्या मारल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. उडी मारुन मृत्यू झालेल्यांमध्ये श्रीलंकेच्या नागरिकाचा समावेश आहे.

बांग्लादेशमध्ये इमारतीला लागलेल्या भीषण आगीमध्ये २५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७० जण जखमी झाले आहेत. बांग्लादेशच्या ढाकामधील बनानी परिसरात ही घटना घडली आहे. २२ मजली एफआर टॉवरला गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास अचानक आग लागली. रौद्ररुप धारण केलेल्या या आगीमध्ये आतापर्यंत २५ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. बांग्लादेश आर्मी आणि एअरफोर्सचे ५ हेलिकॉप्टर आणि नौदलाचे कमांडोंनी बचावकार्य केले.

४ तासानंतर आगीवर नियंत्रण

मिळालेल्या माहितीनुसार, २२ मजली असलेल्या एफआर टॉवरच्या ६ व्या मजल्यावर गुरुवारी भीषण आग लागली होती. अवघ्या काही क्षणात ही आग इतर मजल्यावर पसरत आगीने रौद्ररुप धारण केले. अग्निशमन दलाच्या २१ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आग वाढत चालल्यामुळे त्याच्यावर नियंत्रण मिळवणे कठिण जात होते. तब्बत ४ तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

- Advertisement -

बिल्डिंगवरुन उडी मारुन अनेकांचा मृत्यू

आग लागल्यानंतर टॉवरमध्ये धुराचे साम्राज्य पसरले होते. टॉवरमधील काही लोकांनी धुर पाहून बिल्डिंगवरुन खाली उड्या मारल्या मात्र त्यांचा जीव वाचू शकला नाही. आग लागल्यामुळे ७ जणांनी घाबरुन बिल्डिंगवरुन उड्या मारल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. उडी मारुन मृत्यू झालेल्यांमध्ये श्रीलंकेच्या नागरिकाचा समावेश आहे. काही लोकांनी ब्लिडिंगच्या टेरेसवर जाऊन दुसऱ्या बिल्डिंगच्या टेरेसवर उडी मारुन आपला जीव वाचवला.

आग प्रकरणाच्या चौकशीचे आदेश

बांग्लादेश लष्कराच्या २० जवानांनी टॉवरच्या काचा फोडून अनेकाचा जीव वाचवला. दरम्यान, बांग्लादेश सरकारने एफआर टॉवरच्या आग प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी ४ समितीची स्थापना केली आहे. ही आग कशी लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

- Advertisement -

फेब्रुवारीत बिल्डिंग आगीत ७० जणांचा मृत्यू

२१ फेब्रुवारीला ढाकामध्येच बिल्डिंगला भीषण आग लागली होती. या आगीमध्ये ७० जणांचा मृत्यू तर ५० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले होते. ढाक्याच्या चौक बाजारात ही घटना घडली होती. आग लागलेल्या बिल्डिंगमध्ये दुकान, हॉटेल आणि रेस्टॉरंट होते. त्याचसोबत या बिल्डिंगमध्ये केमिकलचे गोडाऊन होते. त्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले होते. अग्निशमन दलाच्या ३७ गाड्यांनी ही आग विझवली होती.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -