घरताज्या घडामोडीपुढचे २ महिने एकाही न्यूज चॅनलला TRP रेटिंग्ज मिळणार नाहीत!

पुढचे २ महिने एकाही न्यूज चॅनलला TRP रेटिंग्ज मिळणार नाहीत!

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह देशभरात न्यूज चॅनल्सकडून केल्या जाणाऱ्या TRP घोटाळ्याची चर्चा सुरू आहे. यामध्ये इंग्रजीतल्या काही आघाडीच्या न्यूज चॅनल्सची देखील नावं आल्यानंतर त्यावरून मोठा गहजब उडाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर टीआरपी रेटिंग्ज काढण्याच्या प्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर टीआरपी रेटिंग्ज काढणाऱ्या BARC (Broadcast Audience Research Council) या संस्थेने पुढील ८ ते १२ आठवडे, अर्थात किमान २ महिने टीआरपी रेटिंग्ज काढणार नसल्याचं जाहीर केलं आहे. संस्थेनं यासंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. दरम्यान, या कालावधीमध्ये संस्थेची टेक्निकल टीम रेटिंग्ज काढण्याची पद्धती आणि त्यातील कच्चे दुवे शोधून काढण्यावर काम करणार असल्याचं देखील परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे. यादरम्यान, चॅनल्स आणि त्यांच्या कार्यक्रमाचे टीआरपी बंद असले, तरी भाषानिहाय आणि कोणत्या प्रकारचे कार्यक्रम जास्त पाहिले जातात, यासंदर्भातली आकडेवारी जारी केली जाणार आहे. फायनान्शिअल एक्सप्रेसनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

TRP वाढवल्याचा चॅनल्सवर आरोप

BARC कडून दर आठवड्याला गुरुवारी सर्व चॅनल्स आणि त्यांच्यावर येणारे कार्यक्रम यांचे टीआरपी रेटिंग्ज जाहीर केले जातात. त्यावरून जाहिरातदार संबंधित चॅनल किंवा कार्यक्रमात आपल्या जाहिराती देत असतात. सर्वाधिक टीआरपी असणाऱ्या चॅनलवर किंवा कार्यक्रमात लावल्या जाणाऱ्या जाहिरातींना सर्वाधिक दर मिळतो. मात्र, यासाठी देशभरात साधारणपणे ४० हजार बॅरोमीटर्स बसवले असून त्याच आधारावर संपूर्ण देशातल्या टीआरपीचा अंदाज काढला जातो. याच बॅरोमीटर्स बसवलेल्या घरांशी थेट संपर्क करून आपल्या चॅनलचा किंवा संबंधित कार्यक्रमाचा टीआरपी वाढवल्याचा आरोप काही चॅनल्सवर करण्यात आला आहे.

- Advertisement -

किमान २ महिने टीआरपी राहणार बंद!

काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये फक्त मराठी, बॉक्स सिनेमा, रिपब्लिक टीव्ही आणि इंडिया टीव्ही यांच्यावर अशा प्रकारे टीआरपी वाढवल्याचा आरोप केला होता. त्याअनुषंगाने न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या सगळ्या पार्श्वभूमीवर अंतर्गत तपास करण्यासाठी बार्कने टीआरपी रेटिंग्ज देणं ८ ते १२ आठवड्यांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘नुकत्याच घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बार्क बोर्डाने आवश्यक असलेला ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या काळामध्ये रेटिंग्ज मोजण्याच्या प्रणालीचा आढावा घेतला जाईल. या प्रक्रियेला ८ ते १२ आठवडे लागणार आहेत’, असं बार्ककडून स्पष्ट करण्यात आलं आहे.


वाचा सविस्तर – TRP शी आपला काय संबंध?
मुंबई पोलिसांकडून मीडियाचे TRP रॅकेट उघड; Republic TV ची चौकशी होणार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -