बरेलीमध्ये सैराट; भाजप आमदाराच्या मुलीचे बापाविरोधात बंड

bareilly bjp mla rajesh mishra daughter viral video says she has life threat from her family
बरेलीचे आमदार मिश्रा यांच्या मुलीचा व्हायरल व्हिडिओ

उत्तर प्रदेशमध्ये जातीव्यवस्था किती खोलवर रुजलेली आहे, याचे अनेक प्रकरणे आपण याआधी पाहिली असतील. मात्र बरेली जिल्ह्यातील एका प्रकरणाने संबंध देशाचे लक्ष खेचून घेतले आहे. सोशल मीडियाचा किती प्रभावी वापर होऊ शकतो आणि अन्यायाला वाचा फुटू शकते, याचे ज्वलंत उदाहरण समोर आले आहे. बरेली जिल्ह्यातील चैनपूर मतदारसंघाचे आमदार राजेश मिश्रा यांची कन्या साक्षीने दलित समाजातील मुलाशी लग्न केले. त्यानंतर मुलीच्या पालकांनी नवदाम्पत्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप मुलीने केला आहे. दाम्पत्यांनी एक व्हिडिओ काढून आपली व्यथा मांडली आहे तर पोलिसांकडे सरंक्षण मागितले आहे.

आमदाराची मुलगी साक्षी हीने अजितेश नामक दलित मुलाशी हिंदू वैदिक पद्धतीने लग्न केले. मात्र हे लग्न साक्षीच्या वडिलांना मान्य नाही. त्यामुळे त्यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचे मुलीने सांगितले आहे. तसेच वडील आणि भावाने आपल्याला मारायला गुंड पाठवले असून आम्हाला सुरक्षा द्या, अशी विनंती मुलीने व्हिडिओमध्ये केली आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बाजपचे आमदार राजेश मिश्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “माझी मुलगी सज्ञान असून तिला तिचा निर्णय घ्यायचा अधिकार आहे. मी तिला जीवे मारण्याची धमकी दिलेली नाही. मी तर सध्या भाजपचे सदस्य अभियान राबवित आहे.”

या दरम्यान साक्षीने दुसरा एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती राजीव राणा नामक व्यक्तीचे नाव घेत आहे. हा व्यक्ती अजितेशच्या कुटुंबियांना त्रास देत असल्याचा आरोप साक्षीने केला आहे. पप्पा तुम्ही जुने विचार बदलून टाका आणि आम्हाला सुखाने जगू द्या, अशी विनंती साक्षी या व्हिडिओत करताना दिसत आहे. बरेलीचे पोलीस उप महानिरीक्षक राजेश कुमार पांडे यांनी सांगितले की, “आम्ही दोघांनाही सुरक्षा देणार आहोत. त्या दोघांनी त्यांचा पत्ता दिल्यावर तिथे आम्ही त्यांना सुरक्षा पुरवू”