बिहार: मतमोजणीच्या पूर्वसंध्येलाच भाजपा महिला नेत्याच्या पतीवर गोळीबार

निवडणुकीच्या मतमोजणीच्या पूर्वसंध्येला एक धक्कादायक घटना घडली

प्रातिनिधी फोटो

देशाच्या राजकारणात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बिहार राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार असल्याने देशाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. मात्र या निवडणुकीच्या मतमोजणीच्या पूर्वसंध्येला एक धक्कादायक घटना घडली आहे. बिहारमधील भोजपुर जिल्ह्यामध्ये मतमोजणीच्या काही तास आधीच भाजपा महिला मोर्चाच्या नगराध्यक्षाच्या पतीवर गोळीबार करुन त्यांची हत्या करण्यात आली आहे.

अशी घडली घटना

भोजपुर जिल्ह्यातील टाऊन पोलीस स्थानकाअंतर्गत येणाऱ्या सुंदरनगर परिसरामध्ये सोमवारी सायंकाळच्या सुमारास बाईकवर आलेल्या हल्लेखोरांनी स्थानिक न्यायालयाच्या अधिवक्त्यावर गोळीबार केला. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र तिथे त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना दुसरीकडे हलवण्याची तयारी करण्यात आली मात्र वाटेतच त्यांच्या मृत्यू झाला.

भाजपा महिला अध्यक्षांच्या पतीची गोळ्या झाडून हत्या

मृत व्यक्तीचे नाव प्रीतम नारायण सिंह असं आहे. प्रीतम यांच्या पत्नी शहरातील भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत. त्या स्थानिक राजकारणामध्ये खूपच सक्रीय आहेत. विधानसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये त्या फारच सक्रीय होत्या. अगदी प्रचारापासून ते सभांपर्यंत महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्या काम करत होत्या. घटनेची माहिती मिळताच भोजपूरचे पोलीस अधिक्षक किशोर राय, एसडीओपी पंकज कुमार रावत यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

प्रीतम हे बाईकवरुन घरी परत येत असतानाच त्यांना सुंदर नगर परिसरातील मंदिराजवळ दोन बाईकस्वार व्यक्तींना अडवले आणि त्यांची चौकशी करु लागले. प्रीतम हे त्यांच्याशी बोलत असतानाच अचानक त्यांनी प्रीतम यांच्यावर गोळीबार केला. प्रीतम यांना दोन गोळ्या लागल्या. त्यापैकी एक डोक्यात तर दुसरी गोळी पाठीत लागली, असे सांगितले जात आहे. तर प्रीतम यांच्यावर गोळीबार कोणी केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.


Bihar Election 2020 : नातेसंबंधांची निवडणूक! अनेक दिग्गजांचे नातेवाईक मैदानात!