घरCORONA UPDATEकोरोनामुळे मुलाचा मृत्यू झाला, कुटुंब आधी खूप रडलं मात्र स्मशानात त्यांना आनंद...

कोरोनामुळे मुलाचा मृत्यू झाला, कुटुंब आधी खूप रडलं मात्र स्मशानात त्यांना आनंद झाला

Subscribe

बातमीचं शीर्षक वाचून तुमचा गोंधळ उडाला असेल किंवा तुम्ही कोड्यात पडला असाल. शीर्षकावरुन तुम्हाला कोड्यात टाकण्याचा कोणताच हेतू नाही. हा विषयच मुळात तसा झालाय. उत्तर प्रदेशच्या कबीरनगर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला. आरोग्य विभागाने एका कुटुंबाला फोन करुन सांगितले की, त्यांच्या मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. थोड्याच वेळात त्याचे शव घेऊन आम्ही स्मशानात घेऊन येऊ. ही बातमी कळल्यावर संपुर्ण कुटुंब रडायला लागले. दुःखातच ते स्मशानात पोहोचले. तिथे गेल्यानंतर जे घडलं ते आपल्या आरोग्य व्यवस्थेचा बुरखा फाडणारं होतं.

स्मशानात गेल्यानंतर वडिलांनी मुलाचा चेहरा पाहण्याची इच्छा व्यक्त केली. म्हणून पोलीस आणि डॉक्टारांनी विरोध केला असतानाही शवावरील कव्हर बाजूला करण्यात आले. कव्हर काढल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. कारण तो मृतदेह त्यांच्या मुलाचा नसून कुणा दुसऱ्याचा होता. हे कळल्यानंतर अग्नि देणाऱ्या बापाच्या जीवात जीव आला. संपुर्ण कुटुंबाला आपला मुलगा जिवंत असल्याचा आनंद झाला. मात्र दुसऱ्या बाजुला त्यांना पोलीस, डॉक्टरांची चीडही आली.

- Advertisement -

हा सगळा प्रकार मथुरापुर येथील गावातला आहे. या गावातील एका मुलाला कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र अचानक त्याच्या वडिलांना आरोग्य विभागाकडून फोन गेला आणि त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले गेले. अर्थातच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कसेबसे त्याचे कुटुंबिय स्मशानात पोहोचले. कोविड १९ च्या प्रोटोकॉल नुसार अंत्यविधी सुरु होते. मात्र अग्नि देत असताना पित्याला थोडा संशय आला. हे शव आपल्या मुलाचे वाटत नसल्याची त्यांची खात्री झाल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे चेहरा पाहण्याची विनंती केली.

मृतदेहाचा चेहरा पाहिल्यानंतर मुलगा गमावलेल्या पित्याला दुसरा धक्का बसला. कारण मृतदेह त्यांच्या मुलाचा नव्हता. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी झाली असता हा मृतदेह बाजुच्या गावातील युवकाचा असल्याचे कळले. हा युवक काही दिवसांपूर्वी मुंबईहून परतला होता. मात्र तब्येत बिघडल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर काहीच दिवसात त्याचा मृत्यू झाला. स्मशानात हा सर्व प्रकार उघड झाल्यानंतर हा मृतदेह त्याच्या खऱ्या कुटुंबाला सुपूर्द करण्यात आला.

- Advertisement -

झाले असे की, या दोन्ही युवकांची खाट एकमेकांना लागून होती. तसेच त्यांच्या नावात साधर्म्य होते. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना फक्त नाव सांगितले. त्यामुळे पोलिसांचा गोंधळ झाला आणि त्यांनी मृताच्या नातेवाईंकाऐवजी धडधाकट असलेल्या मुलाच्या घरच्यांना फोन लावला आणि गोंधळ झाला. आता रुग्णालय प्रशासन हे सर्व प्रकरण चौकशीच्या नावाखाली दाबण्याचा प्रयत्न करत आहे. नामसाधर्म्यामुळे हा गोंधळ झाल्याचे सांगत सारवासारव केली जात आहे. मात्र यामुळे उत्तर प्रदेशची आरोग्य व्यवस्था किती कमजोर आहे, हे स्पष्ट होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -