बिहारमध्ये भरधाव कार तलावात पडली; ६ मुलांचा मृत्यू

बिहारमध्ये भरधाव कारला भीषण अपघात. अपघातामध्ये ८ ते १२ वयोगटातील ६ मुलांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताचे नेमके कारण अस्पष्ट आहे. जखमी झालेल्या मुलांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

Bihar
Bihar car accident
बिहार कार अपघात

बिहारच्या अररिया जिल्ह्यात मंगळवारी सकाळी भीषण अपघात झालाय. मुलांना घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पियो गाडीला अपघात झाला. भरधाव वेगात असलेली कार झाडाला धडकून थेट तलावात पडली. या अपघातात ६ मुलांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावर स्थानिक नागरिकांनी गर्दी केली. बचावपथक आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने एका मुलाला वाचवण्यात यश आलं आहे.

असा झाला अपघात!

अररियापासून २४ किलोमीटरवर असलेल्या ताराबाडी येथे मंगळवारी सकाळी ७ वाजता ही घटना घडली. भरधाव वेगात असलेल्या गाडीने रस्त्यावर उभे असलेल्या लोकांना उडवले. त्यानंतर ही कार झाडावर आदळून थेट तलावात पडली. रस्त्यावर उभे असलेल्या नागरिकांमध्ये १० जण जखमी झाले असून यामध्ये ४ मुलांचा समावेश आहे. ज्या तलावामध्ये कार पडली त्यामध्ये पाणी जास्त होते. या अपघातामध्ये गाडीमध्ये असलेल्या ६ मुलांचा मृत्यू झाला. अपघातामध्ये मृत्यू झालेल्या मुलांचे वय ८ ते १२ वर्ष आहे.

जखमींवर उपचार सुरु

या अपघातात कारचे मोठं नुकसान झालं आहे. अपघातात मुलांचा मृत्यू पाण्यात बुडून झाला की आणखी कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. अपघातात जखमी झालेल्या नागरिक आणि मुलांवर सध्या नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांचा तपास सुरु आहे.