बिहारमध्ये दहावीच्या १० हजार उत्तरपत्रिका चोरीला!

बिहारमध्ये दहावी परीक्षेच्या १० हजार उत्तरपत्रिका चोरीला गेल्या आहेत. उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यापूर्वीच ही घटना घडल्याने विद्यार्थी तणावाखाली आले आहेत. या प्रकरणामुळे बिहार बोर्डाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे.

Bihar

दहावी बोर्डाच्या निकालापूर्वीच बिहार बोर्डाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. दहावीचे निकाल उद्या, २० जून रोजी जाहीर होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच दहावी बोर्ड परीक्षेतील तब्बल १० हजार उत्तरपत्रिका चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. बिहारमधील एका शाळेने विविध विषयांच्या पेपर प्रतींची मागणी बोर्डाकडे केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. निकालाच्या एक दिवस आधी आलेल्या या बातमीने राज्यात खळबळ माजली आहे. दहावीचे विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत असतानाच आता चोरीच्या घटनेमुळे ते आणखीनच तणावाखाली आले आहेत.

 

बिहार बोर्ड (प्रातिनिधिक चित्र)

‘या’ शाळेने केली तक्रार दाखल

बिहारमधील तक्रार गोपालगंज एस. एस. बालिका इंटरस्कूल शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद कुमार श्रीवास्तव यांनी १५ जून रोजी बिहार बोर्डाकडे दहावीच्या विविध विषयातील पेपर प्रतींची मागणी केली होती. त्यावेळी दहावीच्या १० हजार उत्तरपत्रिका चोरीला गेल्याची बाब बोर्डाच्या लक्षात आली. ५ एप्रिल रोजी एका पेपर तपासणी केंद्रात ठेवण्यात आलेले उत्तरपत्रिकांचे २१३ गठ्ठे चोरीला गेले असून यामध्ये एकूण १० हजार पेपर्स होते. या पेपर तपासणी केंद्राला बंद करून सील करण्यात आले होते.

 

उद्या दहावीचा निकाल जाहीर

दहावीचा निकाल जाहीर होणार

बुधवार, २० जून रोजी बिहारच्या दहावी बोर्डाचा निकाल लागणार आहे. विद्यार्थ्यांना ‘दि बिहार स्कूल एज्युकेशन बोर्ड’ (बीएसईबी) च्या biharboardonline.bihar.gov.in.या वेबसाइटवर हे निकाल पाहता येणार आहेत. हा निकाल राज्य शिक्षणमंत्री तसेच बोर्डाचे व्यवस्थापक घोषित करतील. त्यानंतर निकालाची यादी वेबसाइटवर पाहता येईल.

  • यंदा १७ लाख विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज केले होते
  • ही परीक्षा २१ ते २८ फेब्रुवारी दरम्यान पार पडली
  • १४२६ परीक्षा केंद्रांवर दहावीच्या परीक्षा झाल्या
  • गेल्या वर्षी दहावीचा ५०.१२ टक्के निकाल लागला होता